रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील महत्त्वाची असलेली बावनदी सध्या धोकादायक बनली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदी पुलानजीक या नदीने पात्राचा प्रवाह बदलल्याने महामार्गाला याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे या महामार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर तीर्थक्षेत्र येथून या नदीचा उगम होतो. ही नदी अनेक गावांमधून जाते. शेवटी जयगड येथे अरबी समुद्राला ही नदी मिळते. मात्र ही नदी सध्या धोकादायक बनली आहे. अनेक ठिकाणी तिचा प्रवाह बदलत आहे. हे प्रमाण भविष्यात चिंतेची बाब ठरणार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदी गावानजीक या नदीने प्रवाह बदलला आहे. मुख्य नदीपासून जवळपास ५० फूट अंतरावर प्रवाह गेला आहे. यावर्षीच हा प्रवाह बदलला आहे. हा प्रवाह अगदी मुंबईगोवा राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असल्याने सध्या या ठिकाणाहून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. त्यात चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने याठिकाणी सर्व माती त्या प्रवाहानजीकच आहे. त्यामुळे या रस्त्यावर नदीचे पाणी येऊ शकते. गेल्या दोन दिवसांपासून बरसलेल्या पावसामुळे तर या नदीला महापूर आला आहे. त्यामुळे महामार्गावर रविवारी रात्री या प्रवाहाचे पाणी आले होते. याठिकाणची वाहतूकही थांबवण्यात आली होती पूर्वी या पात्राचा महामार्गाला काहीच धोका नव्हता. आता नदीने पात्रच बदलले आहे, त्यामुळे हा मार्ग डेंजरस बनला आहे. महामार्गाला लागूनच पाणी येत असल्याने याठिकाणी संरक्षक भिंत किंवा अन्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. वेळीच लक्ष देऊन ही कार्यवाह करावी, अशी मागणी होत आहे अन्यथा हा महामार्गच वाहून जाण्यास फार वेळ जाणार आहे. हा प्रवाह का बदलला? याची कारणे शोधणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून यावर उपाययोजना होण्याची गरज आहे.
