घर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद : ॲड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात घर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ते राष्ट्रप्रेमाचे द्योतक आहे, असे प्रतिपादन दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.

अभियानाचा एक भाग म्हणून गुरुवारी रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये अभियानाची सुरुवात घराघरात जाऊन तिरंगा सन्मानपूर्वक प्रदान करून करण्यात आली. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सन्मानाने तिरंगा स्वीकारला आणि मोदीजींनी घराघरात तिरंगा फडकवण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद दिले.

यावेळी श्री. पटवर्धन म्हणाले, आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याबाबत नागरिक प्रचंड उत्सुक आहेत. ७५ वर्षांपूर्वी प्राप्त झालेले स्वातंत्र्य मौल्यवान असून भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी झटलेल्या थोर देशभक्त विभूतींच्या आठवणी या अभियानामुळे जनमानसात तीव्रतेने जाग्या होत असल्याचे प्रत्यंतर येते. देशाच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक असलेला अशोकचक्रांकित तिरंगा लहानथोर सर्वांना प्रिय असून राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेला हा तिरंगा आपल्या घरावर फडकवण्यासाठी जनमानस कमालीचे आतुर असल्याचा अनुभव तिरंगा प्रदान करताना घरोघरी फिरताना आला, असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

ध्वजसंहिता शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून १३ ऑगस्ट सूर्योदयानंतर तिरंगा आपल्या घरावर, कार्यालयावर फडकवण्याची आणि १५ ऑगस्ट सूर्यास्तापर्यंत तो न उतरवता तसाच ठेवण्याची मुभा सर्व नागरिकांना देण्यात आली आहे. नागरिकांनी घरावर तिरंगा फडकवताना तिरंग्यातील भगवा रंग वरच्या बाजूला राहील, या पद्धतीने तिरंगा फडकवावा. तिरंग्याचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. पावसामुळे तिरंगा भिजला तरी अडचण नाही. मात्र तिरंगा फाटणार नाही, त्यावर डाग पडणार नाही याची उचित काळजी घ्यावी. तिरंग्यापेक्षा उंच अन्य ध्वज असणार नाही, याची काळजी घेऊन तिरंगा फडकवण्याची मुभा आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक घरावर, प्रत्येक आस्थापनेमध्ये तिरंगा ध्वज फडकवलेला असेल हे दृश्य राष्ट्रभक्तीचे विहंगम दृश्य असेल, असेही ते म्हणाले.

आजचा उपक्रम राजू कीर यांनी आयोजित केला. त्याप्रसंगी विक्रांत जैन, मोहन पटवर्धन, अतुल लेले, श्री. वैशंपायन, श्री. गोडबोले, शेखर लेले, राजन फाळके, दादा ढेकणे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:03 PM 05-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here