मोदींसोबत असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरेंची तयारी होती, पण राणेंना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं ठाकरे नाराज; केसरकरांचा गौप्यस्फोट

0

मुंबई : शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेनेचे भाजपसोबत संबंध का तुटले, याबाबत गौप्यस्फोट केला आहे.

पंतप्रधान मोदींसोबत असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे यांची तयारी होती, पण नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले, असा गौप्यस्फोट दिपक केसरकरांनी केला आहे. आदित्य ठाकरेंची बदनामी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करायचं ठरवलं होतं, असंही केसरकरांनी सांगितलं. एकनाथ शिंदे आणि इतर आमदार कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरु होते.

‘भाजप आणि शिवसेनेत बोलणी सुरु असताना भाजपच्या 12 आमदाराचं निलंबन झालं. यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संबंध बिघडले. यानंतर नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. यावर उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे अनेक शिवसेना कार्यकर्तेही नाराज झाले. राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांची बदनामी केली. भाजप आणि शिवसेनेतील संबंध सुधारण्याची उद्धव ठाकरेंची तयारी होती. पण नंतरच्या काळात वेळेअभावी ते झालं नाही आणि संबंध आणखी बिघडले’, असं केसरकरांनी सांगितलं.

केसरकरांनी सांगितलं की, ‘एकनाथ शिंदेसह इतर आमदार भाजपसोबत युती करण्यासाठी तयार होते. यासाठी उद्धव ठाकरेंकडे मागणीही केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.’ त्यानंतर शिंदे गट गुवाहटीला पोहोचल्यावरही शिवसेना आणि भाजपमध्ये बोलणी सुरु होती. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून भाजपसोबत युती करण्याला उद्धव ठाकरेंची तयार होती, असा गौप्यस्फोटही केसरकरांनी यावेळी केला. पण भाजपला हे मान्य नव्हतं. याशिवाय शिवसेना आमदारांनाही हे मान्य नव्हतं. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला हे आपल्याला माहित आहे, असंही केसरकर म्हणाले.

शिवसेना राहिली पाहिजे असं आमचं मत आहे मात्र कार्यकर्त्यांच्या भावना भडकावणं योग्य नाही, एकनाथ शिंदे दोन नंबरचे नेते, अशा नेत्याला बाजूला ठेवणं योग्य नव्हतं. एकनाथ शिंदे सातत्यानं बोलत होते, भाजपसोबत जाऊ पण ते झालं नाही म्हणून शिंदे गट अखेर बाहेर पडला, असं केसरकरांनी सांगितलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:48 PM 05-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here