ईडी कोठडीतून संजय राऊत यांचे मित्र पक्षांना पत्र..

0

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडी कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मित्रपक्षांना पत्र पाठवले आहे.

काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध केला होता. त्यानंतर आज संजय राऊत यांनी त्यांचे आभार मानण्यासाठी पत्र लिहिले असल्याचे समोर आले आहे. आपण या दडपशाहीविरोधात संघर्ष करणार असल्याचा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांनी काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले असल्याची माहिती आहे. त्यापैकी खर्गे यांना लिहिलेले पत्रसमोर आले आहे. माझ्यावर झालेल्या कारवाईविरोधात मला कृती आणि विचारातून पाठिंबा दिला. संसदेत आणि संसदेबाहेर माझ्या सहकारी खासदारांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आपण सर्वांनी पाठिंबा दिला, त्यासाठी आभार मानत असल्याचे राऊत यांनी म्हटले. काँग्रेससह इतर पक्षांनी राऊत यांच्या अटकेचा निषेध केला होता. संजय राऊत यांनी म्हटले की, मी वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार वागत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ‘रडायचं नाही लढायचं’ अशी शिकवण दिली होती. त्याच मार्गाने जात असल्याचे राऊत यांनी म्हटले.

आपल्याविरोधात राजकीय सूडबुद्धीतून तपास यंत्रणांद्वारे कारवाई केली जात असल्याचे राऊत यांनी सांगितले. मात्र, दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माझे कुटुंबीय, हितचिंतक यांच्या पाठिंब्यावर या कठीण काळातून लवकरच बाहेर पडू असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:34 PM 05-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here