‘देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचंय, म्हणूनच…’

0

मुंबई : महाविकास आघाडीत शिवसेनेची घुसमट होत असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली.

शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांच्या साथीने त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापना केली. पण राज्यात ३५ दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळालेला नाही. पहिल्या दिवशी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. भाजपाकडे १००पेक्षा जास्त आमदार असूनही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर, शिंदे गटाला कोणती मंत्रिपदं मिळणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. असं असताना आता, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री व्हायचंय असा दावा केला असून त्या संदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणूनच शिंदे गटाला अधांतरी ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी केला. भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत शशिकांत यांनी आरोप केला की फडणवीसांना स्वत:ला मुख्यमंत्री बनायचं आहे त्यामुळे हा सारा डाव खेळला जात आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात लवकरच या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात येईल असा आम्हाला विश्वास आहे. अशा परिस्थितीत ते १६ जण अपात्र ठरल्याचा निर्णय येताच फडणवीस स्वत: फोडाफोडीचं राजकारण करून स्वत:च पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला.

शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाकडून विविध याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. १६ आमदारांच्या अपात्रेपासून सर्वच प्रकारच्या याचिकांवर सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, फडणवीस यांच्या दिल्ली बैठकीत भाजपाची मंत्रिमंडळातील नावे अंतिम झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून अधिकची मंत्रिपदे आणि विशिष्ट खात्यांचा आग्रह धरला जात असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत नक्की कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, लांबत चाललेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे आता भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता वाढत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील ५० आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदारांना संयम ठेवण्याचा सल्ला देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:36 PM 05-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here