हर घर तिरंगा मोहिमेचा राजकीय फायद्यासाठी वापर; प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार  

0

रत्नागिरी : हर घर तिरंगा मोहिमेचा राजकीय फायद्यासाठी वापर करुन घेण्यात आला असल्याची तक्रार शिवसेनेचे संगमेश्‍वर तालुकाध्यक्ष प्रमोद पवार यांच्यासह जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने यांनी प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांच्याकडे केली आहे. देवरुखमध्ये फिरणार्‍या तिरंगा रथावर पक्षाचे चिन्ह आणि झेंडा लावण्यात आला असल्याचे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.

संगमेश्‍वर तालुक्यात हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत राजकीय पक्षाकडून स्वतःच्या प्रसिध्दीसाठी तिरंगा रथ फिरवला जात आहे. रथाचे स्वरुप पाहता यामध्ये राष्ट्रप्रेमापेक्षाही पक्षप्रेमच अधिक दिसत आहे. या रथावर पक्षीय नेतमंडळी, कार्यकर्ते यांच्याच फोटोचा भरणा दिसत असून ते अयोग्य आहे. भारतीय ध्वजसंहिता २००६ भाग ३ च्या कलम ९ मध्ये प्रदान केलेल्या वाहनाशिवाय कोणत्याही वाहनावर ध्वज फडकविण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तरीही कनकाडी येथे फिरत असलेल्या रथावर कायद्याचे उल्लंघन करुन राष्ट्रीय ध्वज लावला गेला आहे. हा रथ फिरवत असताना राज्य शासनाच्या २० जुलै २०२२ च्या निर्णयाचा संदर्भ दिला जातो; परंतु या शासन निर्णयात शासकीय यंत्रणे व्यतिरिक्त इतर कोणत्याही खासगी संस्थेस व पक्षास या मोहिमेच्या प्रचाराचे अधिकार दिलेले दिसून येत नाहीत. तरीही या पक्षातील नेते व कार्यकर्ते समाजाची दिशाभूल करत आहेत. या रथासाठी प्रशासनाकडून परवानगी दिली गेली असेल तर इतरही राजकीय पक्षांना तशी परवानगी देण्यात यावी. अन्यथा फिरत असणार्‍या रथावर व ही मोहीम बेकायदेशीररित्या राबविणार्‍या पक्षावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:39 PM 05-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here