नगरोत्थान योजनेतून रत्नागिरीला सव्वाशे कोटी : आमदार उदय सामंत

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्ते, गटाराच्या कामासाठी राज्य नगरोत्थान योजनेतून सव्वाशे कोटी रुपयांच्या निधीला तत्वतः मंजूरी मिळाली आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे रत्नागिरी विकासकामांना चालना मिळाल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले. तसेच येत्या पाच ते सहा दिवसात रत्नागिरीतील प्रलंबित विकास कामे मार्गी लागतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजन शेट्ये, बिपिन बंदरकर, स्मितल पावसकर, कांचन नागवेकर, बाबू म्हाप, श्री. सुर्वे आदी उपस्थित होते. निधी वितरणाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे, असा गैरसमज पसरवला जात आहे; मात्र प्रत्यक्षात दिलेला निधी योग्य आहे कि अयोग्य याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कामे थांबवण्यात आली आहेत. लवकरच निधी खर्च करण्याच्या सुचना मुख्यमंत्री देणार आहेत. त्यात रत्नागिरीतील कामेही सुरु केली जातील, असे आमदार सामंत यांनी सांगितले.

आमदार सामंत म्हणाले, रत्नागिरी नगरपालिकेतील विकासकामांसाठी 28 जुलैला शासन निर्णय काढण्यात आला होता. त्यामधून 15 कोटी 22 लाख रुपये आणि 4 कोटी 78 लाख रुपये वैशिष्ठ्यपूर्ण निधीतून मिळणार आहेत. हा पहिल्या टप्प्यात निधी आहे. त्याचबरोबर शहरातील 80 फुटी मुख्य रस्त्याबरोबरच नाचणे, थिबापॅलेस येथील कॉक्रिटीकरणासाठी राज्य नगरोत्थानच्या निधीतून 100 कोटी रुपये आणि शहरातील गटारांसाठी 25 कोटी रुपये असा सव्वाशे कोटी निधीला तत्वतः मंजूरी दिली गेली आहे. तो निधीही लवकरच मिळेल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आठ दिवसात विकासासाठी पहिल्या टप्प्यात रत्नागिरी-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघासाठी निधी मंजूर केला आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील विकासकामे होणार आहेत. रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या पथकाकडून पाहणी झाली असून केंद्रीय पथकाकडून पाहणी केल्यानंतर महाविद्यालयाच्या प्रवेशाला आरंभ होईल. या महाविद्यालयासाठी दोन जागा निश्‍चित केलेल्या आहेत.

सुरवातीला जिल्हा शासकीय रुग्णालय, मनोरुग्णालय आणि महीला रुग्णालयाचा परिसर एकत्र करुन जागा होणार आहे. तसेच कापडगाव येथेही 25 एकरची जागा सुचवण्यात आली आहे. या महाविद्यालयासाठी 560 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांचाही प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार आहे.

केंद्र शासनाकडून रत्नागिरीत होणार्‍या प्राणीसंग्रहालयाचा तत्वतः मान्यता दिलेली आहे. सिंधुरत्न योजनेमधून निधी देण्यात येणार आहे. तसेच आंबा बागायतदारांचे प्रश्‍न वेगवेगळे आहेत. ते एकत्रित करुन द्या अशा सुचना दिल्या आहे. मुख्यमंत्री दिल्लीतून आल्यानंतर बैठक घेणार आहे. त्यावेळी ते प्रश्‍न सोडविले जातील. त्यामध्ये कृषीपंपाची वाढीव विजबिले महावितरणकडून आकारण्यात आली असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. हे सर्व प्रश्‍न येत्या पाच ते सहा दिवसात सोडविले जातील, असे आमदार सामंत यांनी सांगितले.

सेंट्रल किचनच्या नावाखाली बाहेरुन आलेल्या ठेकेदारांकडून न शिजलेला पोषण आहार शाळांमध्ये वितरीत केला जात असेल तर त्यांच्या मुलांच्या जीवाशाी खेळल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल केले पाहीजेत, अशी परखड प्रतिक्रिया आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केली. तसेच आतापर्यंत स्थानिक बचत गट चांगल्या पध्दतीने काम करत होते, निविदेमध्ये त्यांना कशा पध्दतीने न्याय मिळेल याकडे पालिका प्रशासनाने लक्ष दिले पाहीजे होते, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, यासंदर्भात रत्नागिरी एज्यूकेशन सोसायटीचे सतीश शेवडे यांनीही माझ्याकडे तक्रार केली आहे. संस्थाची नियुक्ती मारुन मुटकून करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. याला अधिकारी जबाबदार आहेत. मोठ्याप्रमाणात जेवण तयार करुन ते वितरीत करताना अडचणी येणारच. पोषण आहार वाटप करणार्‍या व्यक्तींचीही तपासणी करणे गरजेचे होते. पुर्वी जे प्रामाणीकपणे जेवण करत होते, त्यांना डावलून निवडलेल्या संस्थांकडून चुकीच्या पध्दतीने आहार देणे एकप्रकारे लहान मुलांच्या जीवाशी खेळल्यासारखेच आहे. संबंधितांना वारंवार संधी देण्यापेक्षा त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावयास हवे होते. कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांनी यावर लक्ष दिले पाहीजे. स्थानिक बचत गटांना संधी दिली असती तर लोकांना रोजगार मिळाला असता. ही बाब प्रशासनाने लक्षात घेतली पाहीजे. ही परिस्थिती फक्त रत्नागिरीतच नाही तर संपूर्ण राज्यात उद्भवणार आहे. त्यामुळे चौकशी झालीच पाहीजे.

आझादी का अमृत महोत्सव उपक्रम केंद्र शासनाकडून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविला जात आहे. प्रत्येक घरात तिरंगा फडकवला जाणार आहे. रत्नागिरी-संगमेश्‍वर मतदारसंघातील 71 हजार कुटूंबांना मोफत तिरंगा देण्यात येणार आहे. आमदार फंडामधून याला निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आमदार सामंत यांनी जाहीर केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:59 PM 08-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here