वेगवान वाऱ्यांमुळे मच्छीमारी नौका बंदरातच उभ्या

0

रत्नागिरी : वेगवान वारे आणि मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला असून, मासेमारीत विघ्न आले आहे. हंगामाच्या आरंभीच मच्छीमारांना फटका बसला आहे. पाण्याला प्रचंड वेग असल्यामुळे नौका पाण्यात उभ्या करणे शक्य नाही. त्यामुळे नौकांनी भगवती बंदर येथे सुरक्षेसाठी आसरा घेतला आहे.

जून आणि जुलै या दोन महिन्यांत मासेमारीला शासनाच्या निर्देशानुसार बंदी केली जाते. गेल्या १ ऑगस्टला बंदी कालावधी संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील वीस टक्के मच्छीमार समुद्रावर गेले. समुद्रही शांत असल्याने वातावरण मासेमारीला पूरक होते. यांत्रिक नौका खोल समुद्राकडे जाऊ लागल्या. पहिल्याच दिवशी समुद्रात गेलेल्या नौका दोन दिवसांनी हर्णै बंदरात आल्या, तर त्यानंतर पुन्हा मासेमारीला रवाना झालेल्या नौकांना वारा, पावसाने गाठले. खोल समुद्रातील वातावरण बिघडल्यामुळे सुरक्षिततेसाठी नौकांनी जयगड, भगवतीसह जवळच्या बंदरात नांगर टाकला. दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. वाऱ्यामुळे लाटा उसळल्या असून या परिस्थितीत जाळ्यांचे रोप तुटण्याची भीती असते. जाळे वाहून जाते किंवा लाटांच्या तडाख्याने जाळी तुटतात. हे नुकसान टाळण्यासाठी मच्छीमार नौका बंदरात उभ्या करतात.

जिल्ह्यात सुमारे ३ हजाराहून अधिक नौका आहेत. त्यापैकी सुमारे सहाशेहून अधिक नौकांनी मासेमारीला सुरवात केली. पण आता त्यात व्यत्यय आला आहे. हवामान विभागाकडून चार दिवसांचा इशारा देण्यात आला आहे. खराब वातावरणाचा फटका मच्छीमारांना पहिल्या आठवड्यातच बसला आहे. आता पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमेचा मुहूर्त त्यांना साधावा लागणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:34 PM 08-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here