मुंबई : बंगालच्या उपसागरापासून दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगतच्या हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलांमुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे.
पुढील तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असून, मंगळवारी पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे.
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयंता सरकार यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पुढील तीन दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागराच्या उत्तर पश्चिम आणि लगतच्या पश्चिम मध्य भागावरील आणि दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्र प्रदेशवर कमी दाबाचे क्षेत्र आहे. येत्या २४ तासांत ही प्रणाली आणखी जोर पकडेल. त्यामुळे पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीवर, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरासह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. एक ते दोन ठिकाणी अतिवृष्टी होईल.
९ ऑगस्ट
रेड अलर्ट : पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली
ऑरेंज अलर्ट : मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा
१० ऑगस्ट
ऑरेंज अलर्ट : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली
११ ऑगस्ट
ऑरेंज अलर्ट : पालघर, नाशिक, अकोला, अमरावती
सोमवारी मुंबई आणि परिसरात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी दिवसभरात अधूनमधून कोसळत होत्या. गेल्या आठवड्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून राज्यभरात पावसाच्या स्थितीत सातत्याने बदल होत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 09-Aug-22
