रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात गेली तीन चार दिवस पूरस्थिती असून म्हाडा अध्यक्ष व स्थानिक आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करुन, नागरिकांना दिलासा दिला. शीळ येथील धरणाच्या सांडव्याजवळील कोसळलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी करुन त्यांनी अधिका-यांना सूचना दिल्या,तीन-चार दिवस कोसळणाच्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील खाडीपट्टीमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काजळी नदीला आलेल्या पुरामुळे हरचिरी, चांदेराई, हातिस, तोणदे, सोमेश्वर, काजरघाटी, गुरुमळी या गावांना फटका बसला आहे. खाडीकिनाच्यावरील मोठ्याप्रमाणात शेती पाण्याखाली गेली आहे. चांदेराई गावातील बाजारपेठ सलग चौथ्या दिवशी पाण्याखाली होती. आमदार उदय सामंत यांनी चांदेराई पुलापर्यंत जाऊन पाण्याचे रौद्ररुप पाहिले. यावेळी उपस्थित अधिका-यांना त्यांनी सूचना केल्या. नागरिक व व्यापारी वर्गाच्या नुकसानीचे योग्य पध्दतीने पंचनामे करण्यास सांगितले. येथील स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.
पुराचा फटका बसलेल्या ग्रामस्थांना योग्य ती मदत पोहचवण्याच्या दृष्टीनेही त्यांनी चर्चा केली, हातिस, सोमेश्वर, टेंभ्येपूल गावांनाही त्यांनी भेटी दिल्या व मंडल अधिकारी, तलाठी यांच्याशी चर्चा केली. मुचकुंदी नदीला आलेल्या पुरामुळे शिवारआंबेरे, पूर्णगड, कशेळी भागात पाणी भरले आहे. अनेक घरांना याचा फटका बसून नुकसान झाले. आ. सामंत यांनी या भागातील सर्व नुकसानीची माहिती घेतली. जयगड़ खाडीला आलेल्या पुरामुळे परचुरी येथील ग्रामस्थांचे नुकसान झाले. आ. सामंत यांनी याभागात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, माजी जि.प. उपाध्यक्ष राजेश मुकादम, उपतालुकाप्रमुख बावा चव्हाण,जि.प. सदस्य माधवी गिते, पं.स. सदस्य परशुराम वेल्ये यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाच्या शीळ धरणाच्या सांडव्याची भिंत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर आ. सामंत यांनी धरणाला भेट दिली. सांडव्याजवळच्या संरक्षण भिंतीची पाहणी करतानाच, धरणाच्या सुरक्षेबाबतही त्यांनी माहिती घेतली.
