रत्नागिरी : कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य आणि पोलीस यंत्रणा प्रचंड काम करीत असून त्यांचे कप्तान देखील तितकेच सतर्कतेने संपूर्ण यंत्रणा हाताळताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे दिवसरात्र एक करून जिल्ह्यातील कामकाज बघत असल्याचे पहावयास मिळत आहेत. काल शुक्रवारी सापडलेला रुग्ण हा केवळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या सतर्कतेमुळे मिळाला असल्याचे मत ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. जिल्हा पोलीस अधीक्षकांना मुंबईतून त्यांच्या एका मित्राने दिलेल्या माहितीवरून या रुग्णाचे लोकेशन शोधण्यात आले आणि नेमका हा रुग्ण कोरोना बाधित निघाला. पोलीस दलाला मिळणारी प्रत्येक माहिती नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन तपासण्यात येत आहे. अजूनही नागरिकांनी आपली माहिती लपवू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
