भडे ग्रामपंचायतीत विधवांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

0

लांजा : विधवांना समाजात चांगले स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न म्हणून भडे ग्रामपंचायतीने येत्या स्वातंत्र्यदिनी विधवांच्या हस्ते ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम करायचे ठरविले आहे.

अनुसया महिला स्वयंसेवी संस्थेमार्फत विधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी पूर्णांगिनी सन्मान कार्यक्रम काही दिवसांपूर्वी घेतला होता. कोणत्याही शुभ कार्यात या महिलांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील भडे ग्रामपंचायतीने येत्या १५ ऑगस्ट रोजी पूर्णांगिनीच्या हस्ते ध्वजवंदन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व ग्रामस्थांनी केले आहे.

विधवांना सन्मानाने जगता यावे, अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात, या हेतूने विधवा प्रथाबंदीची अंमलबजावणी राज्यात सगळीकडे सुरू झाली. केवळ प्रथा बंद करुन उपयोग नाही तर प्रत्यक्षात विधवांना कौटुंबिक, सामाजिक शुभकार्यात सक्रिय सहभागाचा हक्क मिळावा यासाठी अनुसया संस्थेने सर्व पूर्णांगिनींना एकत्र आणून त्यांच्या हस्ते हळदीकुंकू कार्यक्रम केला.

यावेळी कार्यक्रमाला भडे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यानंतर जिल्हाभरात याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याची सुरुवात भडे ग्रामपंचायतीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here