‘पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदासाठी वाट पाहत बसू नये, थेट वरिष्ठ नेतृत्त्वाला जाऊन भेटावं’

0

जळगाव : शिंदे-फडणवीस सरकारच्या नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून आता भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी पंकजा मुंडे यांना मंत्रिपदासाठी वाट पाहत न बसता थेट वरिष्ठ नेतृत्त्वाकडे जाऊन दाद मागण्याचा सल्ला दिला आहे. ते गुरुवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी एकनाथ खडसे यांना पंकजा मुंडे यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळाल्यामुळे सुरु झालेल्या चर्चेविषयी विचारण्यात आले. त्यावर एकनाथ खडसे यांनी म्हटले की, भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत. अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी संबंधित जे लोक आहेत, त्यांना डावलले जात आहे. पंकजा मुंडे यांच्यावर तर सातत्याने अन्याय होत आहे. आतादेखील पुढील मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतील की नाही, याबाबत शंकाच वाटते. माझ्या पंकजा मुंडे यांना शुभेच्छा आहेत. परंतु, त्यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी काही काळ वाट न पाहता वरिष्ठांना भेटावे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

मीदेखील गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत होतो. भाजपमध्ये जे जे लोक मुंडेंच्या जवळ होते, ते आता बाजूला पडले आहेत. मात्र, पुढील काळात त्यांना न्याय मिळेल, अशी आशाही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. तसेच मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ४० दिवसांनी झाला. आता पालकमंत्र्यांच्या नियुक्तीसाठी आणखी किती वेळ लागेल, हे माहिती नाही. पण मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण दिसत आहे, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here