रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून देशासह राज्यातही संचारबंदी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश असल्याने गावी जाण्यासाठी चक्क आपल्या जिवंत काकीला मरणाचे नाटक करायला लावणाऱ्या मुंबई येथील दोन तरुणांचा धूळफेक करण्याचा प्रयत्न रत्नागिरी पोलिसांनी मोडून काढला आहे. राजापूर येथील आपली काकी मयत झाली आहे, असे सांगून तसेच पोलिसांपुढे हातापाया पडून विनवणी करून नाकाबंदीतून निसटण्याची या दोन तरुणांची युक्ती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलिसांमुळे उघड झाली आहे. भरणे नाका येथील नाकाबंदीत या दोन तरुणांना पोलिसांनी अडवलं. त्यावेळी कर्तव्यावर असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना शंका आली. खात्री करण्यासाठी त्यांनी घरी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितला. संबंधित तरुणांच्या घरच्यांनी देखील काय करायचं हे देखील आधीच ठरलं होतं. त्या तरुणांच्या काकीने पांढऱ्या कापडाने अंगावर लपेटून घेत जिवंतपणी मेल्याचे सोंग घेत पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही पोलिसांना काहीतरी वेगळं वाटलं म्हणून त्या गावच्या पोलीस पाटलाला खात्री करण्यास सांगितलं. काही वेळातच त्यांचं भांड फुटलं त्या दोन तरुणांना पोलिसांच्या नाकाबंदीतून गावाकडे येण्यासाठी हा ठरलेला बनाव असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्या दोन तरुणांची दुचाकी जप्त केली असून त्यांना खेडमध्येच क्वारन्टाइन करून ठेवण्यात आले आहे.
