नवी दिल्ली : एकेरी व दुहेरी सामने खेळण्यात सक्षम असलेल्या साकेत मायनेनी याचे पाकिस्तानविरुद्ध होणार्या डेव्हिस कप टेनिस लढतीसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) निवडलेल्या संघात आघाडीच्या एकेरी व दुहेरी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. प्रज्ञेश गुणेश्वरन आणि रामकुमार रामनाथन एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करतील. तर, इस्लामाबाद येथे 14 व 15 सप्टेंबरला ग्रासकोर्टवर होणार्या सामन्यात रोहन बोपन्ना व दिविज शरण दुहेरीत खेळतील. दुखापतीमुळे सुमित नागल उपलब्ध नसल्याने रोहित राजपालच्या नेतृत्वाखाली असलेल्या पाच सदस्यीय समितीने मायनेनीची निवड केली. जो क्रमवारीत आघाडीचा भारतीय खेळाडू आहे. युवा व प्रतिभावंत खेळाडू शशी कुमार मुकुंदला राखीव सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे. मायनेनीने भारताच्या गेल्या सामन्यात सहभाग नोंदवला नव्हता. जेव्हा भारताला गेल्या वर्षी कोलकाताच्या साऊथ क्लब ग्रास कोर्टवर इटलीकडून 1-3 असे पराभूत व्हावे लागले. मायनेनी गेल्या वर्षी सप्टेंबर 2018 मध्ये डेव्हिस चषक सामना खेळला होता. त्यावेळी भारताने सर्बियाचा दौरा केला होता. त्यावेळी मायनेनी व बोपन्ना जोडीला निकोला मिलोजेव्हिच आणि देनिलो पेत्रोव्हिच जोडीकडून सरळ सेटमध्ये पराभूत व्हावे लागले. मायनेनीने गेल्या आठवड्यात अर्जुन काधेसोबत चेंग्दू चॅलेंजर स्पर्धेचे जेतेपद मिळवले. भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध सहा डेव्हिस कप सामने खेळले आहेत व एकदाही भारताला पराभवाचा सामना करावा लागलेला नाही.
