मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व निवासी डॉक्टर पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून बुधवारी सकाळपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. स्टायपेंडच्या (भत्ता) मुद्दयावरून निवासी डॉक्टरांकडून हा बेमुदत संप पुकारण्यात येत आहे. स्टायपेंडच्या मुद्द्यासोबतच अजून काही मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्याने संपाचे हत्यार उगारण्यात आले आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मार्ड अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे म्हणाल्या, स्टायपेंड वाढीसह अनेक मागण्या आम्ही सरकारकडे केल्या. मात्र आम्हाला फक्त आश्वासने मिळतात. एप्रिल, २०१९ मध्ये आम्हाला स्टायपेंड वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते अद्याप पूर्ण झाले नाही. स्टायपेंड वेळेवरही मिळत नाही. डॉ. डोंगरे पुढे म्हणाल्या, स्टायपेंड व्यतिरिक्त आमच्या इतरही मागण्या प्रलंबित आहेत. टीबी झालेल्या डॉक्टरांना आजारपणाची आणि गर्भवती महिला डॉक्टरांना प्रसूतीची भरपगारी रजा मिळावी, तसा नियम असायला हवा. तसेच पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना मान्यता नाही. फक्त २,२७८ लोकांना मान्यता आहे, इतरांना देण्यात आलेली नाही. प्रत्येकाला मान्यता मिळायला हवी. अशा विविध मागण्यांसाठी पुणे, कोल्हापूर वगळता राज्यात इतर सर्वत्र निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे. राज्यातील १६ वैद्यकीय रुग्णालयातील ४,०६० निवासी डॉक्टर या संपात सहभागी झालेत. त्यात मुंबईतील २००० पेक्षा जास्त डॉक्टरांचा समावेश आहे. आमच्या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही याची आम्ही दक्षता बाळगली आहे. सध्या कुठेही आपत्कालीन परिस्थिती नाही, असेही डॉ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले.
