जिल्ह्यातील 13 हजार महिलांना ‘उमेद’ च्या माध्यमातून रोजगार

0

रत्नागिरी : महिलांना सक्षम व स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाने ‘उमेद’ अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यातील 1 हजार 300 बचतगटांना 43 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नवनवीन उद्योग उभारण्यासाठी महिलांना हातभार मिळणार आहे. तब्बल 13 हजार महिलांच्या उद्योग, व्यवसायाला ‘उमेद’ मिळाल्याचे दिसून येत आहे.

गरिबांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा व त्यातून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होवून उपजिवीकेत सुधारणा व्हावी, यासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान शासनस्तरावर राबवण्यात येत आहे. यातूनच बचतगटाला चालना देण्यासाठी उमेद हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानात गरिबी निर्मूलनाचा विचार करण्यात आला असून समुदाय विकासापासून शाश्वत उपजिवीका निर्माण करण्यापर्यंतचा सर्व बाबींचा समावेश आहे. बचतगटाद्वारे महिलांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक कृषी परिवर्तन प्रकल्पच्या माध्यमातून रत्नागिरी, संगमेश्वर व लांजा या तीन तालुक्यात तालुका उदयोग विकास केद्राची बांधणी करण्यात आली आहे. अकृषी प्रकारातील व्यवसायाला बळकटी व चालना देण्यासाठी वैयक्तिक व समुहाला समुदाय उदयोग निधीच्या माध्यमातुन वार्षिक 12% दराने खेळते भांडवल उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. रत्नागिरी, संगमेश्वर लांजा तालुक्यातील 150 व एकुण 450 वैयक्तिक/ सामुहिक उदयोगांना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी एकूण दीड कोटी रुपये दिले जाणार असून त्यापैकी तीन तालुक्यांना प्रत्येकी रक्कम रु. 25 लाख व एकूण रक्कम रु. 75 लाख निधी वितरीत करणात आला.

स्वयंसहाय्यता समुहातील महिलांना विविध टप्यावर 1,2,3 व 4 थ्या डोसच्या माध्यमातून किमान 1.00 लाख ते 20 लाख पर्यंत बँक अर्थसहाय्य उपलब्ध करून देणेत येत असते. यामध्ये रक्कम रु. 3.00 लाख पर्यंत 7 टक्के व्याज दराने पतपुरवठा होत आहे. रक्कम रु. 3.00 पर्यंत समूहांना सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी व्याज अनुदान योजनेच्या माध्यमातून 7 टक्के व्याज अनुदान प्राप्त होत असल्याने समूहांना शून्य टक्के व्याजदराने बँक अर्थसहाय्य उपलब्ध होत आहे. या अर्थसहाय्यमुळे स्वयंसहाय्यता समुहातील महिलांना व्यवसाय वाढी करिता आर्थिक पाठबळ मिळणार आहे. आझादी का अमृत महोत्सव कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील 1309 समूहांना रक्कम रु. 42 कोटी रकमेचे बँक अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे.

‘आझादी का अमृत महोत्सव’ व महाजिविका अभियानाचे औचित्य साधून एकूण 43 कोटी 50 लाख रुपयांचा चेक यावेळी बचतगटांना देण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी बी.एन.पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक मोहितकुमार गर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here