रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाला आयुष्मान भारत योजनेचे प्रशस्तिपत्र

0

रत्नागिरी : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाला आयुष्यमान भारत योजनेतील महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेच्या उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्याकरिता प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. मनोरुग्णालयाने रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागातील खासगी आणि शासकीय रुग्णालयात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ. आमोद गडीकर, मानोसोपचार तज्ज्ञ डॉ. संजयकुमार कलकुटगी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश ढगे आणि व्यवसायोपचार तज्ज्ञ कृणाल देसाई यांनी रुग्णालयातर्फे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून प्रशस्तीपत्रक स्वीकारले.

रुग्णालयात मे २०२१ पासून महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचा प्रारंभ झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश ढगे आणि व्यवसाय उपचार तज्ज्ञ कृणाल देसाई यांच्याकडे या योजनेची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी ६० टक्के रुग्णांना या योजनेचा लाभ दिला गेलेला आहे. उर्वरित रुग्ण या योजनेच्या निदानात बसत नव्हते, तर काहींकडे मूळ आणि आवश्यक प्रमाणपत्र नव्हती. योजना राबविताना अनेक अडचणी आल्या, तरी डॉ. गडीकर, मानोसोपचार तज्ज्ञ डॉ. अमित लवेकर, डॉ. संजयकुमार कलकुटगी आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावर वेळोवेळी मार्ग काढण्यात आला.

या योजनेच्या यशस्वीतेकरिता राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सर्व अधिकारी, डॉ. कोमल हुले, डॉ. चौगुले, ऋषीकेश शेलार आणि संकेत हातीस्कर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या योजनेतून रुग्णालयांना मिळणाऱ्या निधीतून रुग्णांकरिता अधिक सोयीसुविधा देण्याच्या उद्देशाने व विविध उपक्रम राबविणे शक्य होणार आहे.

रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाचे परिपूर्ण मूळ प्रमाणपत्र (आधार कार्ड व रेशन कार्ड) रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना आणावे, असे आवाहन अधीक्षक डॉ. गडीकर यांनी केले आहे. आंतर रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सोयदेखील प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरू झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:25 PM 18/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here