रत्नागिरी : आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याबाबत राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी पुढाकार घेतला असून आज (दि. ६ एप्रिल) इच्छुकांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. जगभरात करोनाचा प्रादुर्भाव झाला असून जिल्ह्यातही काही रुग्ण आढळले आहेत. या आजारावर उपचार करण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतत कार्यरत आहे. मात्र जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयासह सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर, भूलतज्ज्ञ, औषध निर्माण अधिकारी, नर्सेस, टेक्निशियन, वार्डबॉय आदी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती करावी, असे निवेदन राजापूरचे आमदार श्री. साळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. त्याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात भरतीप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या तात्पुरत्या पदांसाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत dpmratnagiri.2017@gmail.com या ईमेल आयडीवर विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. सोबत पदवी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे स्कॅन करून पाठवून द्यावीत. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेत भाग घेऊन देशावर आलेल्या करोनारूपी संकटाशी लढाई योगदान करावे, असे आवाहन श्री. साळवी यांनी केले आहे.
