मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूर्ण क्षमतेने करोनाच्या संकटाचा सामना करताना दिसत आहेत. त्यांचेकडे येणाऱ्या प्रत्येक छोटया-मोठया सुचनांची अंमलबजावणी करण्याचे काम त्यांचेकडून होत आहे. करोनाचा सामना करण्याकरीता ते २४ तास अलर्ट आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी योग्य त्या उपाय योजना हाती घेतल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकप्रतिनिधींशी, जनतेशी संवाद साधत आहेत. नागरिकांनी घाबरु न जात शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे ते आवाहन सातत्याने करत आहेत. करोनाच्या सामना करतानाची त्यांची रोजची धडपड महाराष्ट्र विसरणार नाही. महामारीचा सामना करण्याकरीता कार्यरत असणाऱ्या राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्याकडून कौतुक केले जात असून सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास दिल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बळ मिळाले असल्याचेही गृहराज्यमंत्री देसाई यांनी म्हटले आहे.
