तारीख पे तारीख; ‘या’ कारणामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

0

नवी दिल्ली : शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटामध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. १२ ऑगस्टची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी याप्रकरणाची सुनावणी होणार होती. परंतु आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. आता ही सुनावणी मंगळवारी (२३ ऑगस्ट) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेना कोणाची आणि शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरणार का, याच्या निकालासाठी आणखी एका दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी सातत्याने लांबणीवर टाकली जात आहे. या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यादरम्यान शिंदे गट शिवसेनेवर हक्क सांगण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारात गेला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांनाही पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा शिवसेनेने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याबद्दलच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती मिळवून घेतली होती. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. पण आयोगाने दोन आठवड्यांचाच वेळ दिला आहे. ती मुदतही २३ ऑगस्टलाच संपत आहे.

याप्रकरणाची सुनावणी वारंवार लांबवणीर पडत असल्याने अनेक चर्चांना उधाण झाले आहे. निष्पक्ष न्यायाचा आग्रह धरणाऱ्या आणि परखड मतं व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध असलेले सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसांमध्ये संपत आहे. त्यानंतर यू.यू. लळीत हे सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतील. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे गेल्यास निकाल लागण्यास खूपच विलंब लागू शकतो. याकाळात शिवसेनेची पूर्णपणे वाताहात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खरी शिवसेना कोणाची?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांनी दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे गेल्या ११ जुलैपासून या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा विचार न्या. रमणा यांनी व्यक्त केला आहे; मात्र अजून घटनापीठाची स्थापना झालेली नाही.

दरम्यान, महाराष्ट्राचे सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर एकूण सहा याचिका आहेत. सर्व सहा याचिका एकत्रित करून घटनापीठाकडे देण्यास कोणीही अद्यापपर्यंत विरोध दर्शविलेला नाही. त्यामुळे सर्व सहा याचिका एकत्रितपणे घटनापीठाकडे सोपवल्या जातील, अशी शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 22/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here