रत्नागिरीत शेअर बाजाराचे मोफत ऑनलाइन शिक्षण

0

रत्नागिरी : करोनाच्या संकटामुळे लॉकडाउनमुळे वेळेचा सदुपयोग करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने मार्ग शोधत आहे. त्याचप्रमाणे मूळच्या रत्नागिरीच्या आणि सध्या पुण्यात कार्यरत असलेल्या एका तरुण प्राध्यापकाने या काळात शेअर बाजाराचे मोफत ऑनलाइन धडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शौनक माईणकर असे या तरुण प्राध्यापकाचे नाव आहे. शौनक सध्या पुण्यातील ‘बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स’मध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शेअर मार्केट ट्रेडिंग आणि संबंधित विषय पुण्यातील नामवंत कॉलेजमध्ये शिकवण्याचा, तसेच प्रत्यक्ष ट्रेडिंगचा त्यांना सुमारे दोन वर्षांचा अनुभव आहे. अभ्यासपूर्ण ट्रेडिंग केले तर शेअर बाजारातून आर्थिक स्वावलंबित्व मिळू शकते, असे त्यांचे मत आहे. म्हणूनच सध्या रत्नागिरीत असताना घरूनच त्यांनी या विषयाचे ऑनलाइन धडे घेण्याचे ठरवले. झूम या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅपवरून शौनक माईणकर यांनी दोन एप्रिलपासून स्टॉक टॉक या नावाने हा १० दिवसांचा कोर्स सुरू केला आहे. दररोज सायंकाळी चार वाजता हा ऑनलाइन क्लास सुरू होतो. कॉलेजचे विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार व्यक्ती, आर्थिक क्षेत्रातील व्यावसायिक, व्यापारी, व्यवस्थापक अशा कोणालाही हा कोर्स उपयुक्त आहे. माध्यमिक शिक्षणाएवढ्या पातळीचा गणित विषय समजणारी कोणीही व्यक्ती या क्लासला हजेरी लावू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. हा कोर्स सोप्या इंग्रजी भाषेतून आहे. माईणकर यांच्या या कोर्सला चांगला प्रतिसादही मिळत असून, आतापर्यंत दररोज सुमारे ४५ व्यक्ती यात सहभागी होत आहेत. कोर्समध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी माईणकर यांच्याशी shaunakmainkar@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा फेसबुक मेसेंजरवर संपर्क साधून आपली उपस्थिती निश्चित करावी. लॉकडाउननंतर आर्थिक बचत, गुंतवणूक आणि संपत्तीवृद्धी यावरच प्रत्येकाचे लक्ष असेल. आपल्याकडील पैसा अभ्यासपूर्वक चांगल्या ठिकाणी गुंतवून संपत्तीवृद्धीच्या मार्गावर चालण्यासाठी या उपक्रमामुळे मदत होणार आहे. त्यासाठी या कोर्सचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here