उक्षी धरणावरून वाहून गेलेल्या करूणा मूर्ती यांचा मृतदेह सापडला

0

रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी धरणावरून परतताना इको कार नदीत कोसळून पाण्यासोबत वाहून गेलेल्या करूणा मूर्ती यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हाती लागला. सर्वप्रथम वाहून गेलेली कार सापडली आणि थोड्या वेळाने करूणा मूर्ती यांचा मृतदेह सापडला. दुर्घटना घडलेल्या ठिकाणापासून पाचशे मीटर अंतरावर कार आणि मृतदेह आढळून आले. रविवार ४ ऑगस्ट रोजी सुट्टीनिमित्त जयगड येथील जिंदल कंपनीतील सहाजण पिकनिकसाठी उक्षी धबधब्यावर गेले होते. सकाळी धबधब्यावर पोहचल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सहाजण इको कारने जयगड येथे माघारी परतत होते. यावेळी उक्षी गावातील जुन्या पुलावर कार नदीत कोसळल्याची दुर्घटना घडली. पुलाआधी असलेल्या वळणावर अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावरून नदीत कोसळली. गाडी नदीत कोसळत असल्याचा अंदाज आल्याने हेरंबा कदम, अतुल करंदीकर, प्रसाद शिर्के, प्रशांत म्हात्रे, पराग परेडकर यांनी गाडीतुन उड्या मारत स्वतःचा जीव वाचवला. तर गाडीतील करुणा मूर्ती गाडीसोबत नदीत फेकले गेले. अवघ्या काही सेकंदात गाडी नदीतुन वाहत दूरवर गेली. परंतु, कार आणि वाहून गेलेले करूणा मूर्ती हाती लागले नव्हते. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम वाहून गेलेली कार हाती लागली. तर थोड्या वेळाने करूणा मूर्ती यांचा मृतदेह हाती सापडला.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here