कोयना प्रकल्पग्रस्तांचे उपोषण स्थगित, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून दखल

0

चिपळूण : कोयना प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे, यासाठी गेल्या सात दिवसांपासून पोफळी येथील महाजनको कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरू होते. अखेर या उपोषणाची दखल घेण्यात आली असून, कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिवेशन कालावधीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसे लेखी पत्र उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून उपोषणकर्त्यांपर्यंत पाठवण्यात आल्याने रविवारी सायंकाळी उशिरा उपोषण स्थगित केले.

गेल्या सात दिवसांपासून पोफळी येथे कोयना प्रकल्पग्रस्तांचे आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी माजी आ. सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांसमवेत पत्रकार परिषद घेऊन कोयना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा दिला होता.

या उपोषणादरम्यान काही उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली. या उपोषणाची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दखल घेत लवकरच शासनस्तरावर अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याची ग्वाही दिली होती.

दुसरीकडे आ. शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान, रविवारी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून उपोषणकर्त्यांपर्यंत पत्र पाठवण्यात आले. हे पत्र उद्योगमंत्री यांना देण्यात आले असून, यानुसार उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दि. १९ रोजी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या उपोषणाची माहिती देऊन या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली होती.

यानुसार अधिवेशन कालावधीत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठकीचे निर्देश देण्यात आले असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या नंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. या उपोषणाला तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांच्यासह अन्य राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकत्यांनी व स्थानिक ग्रामस्थानी सक्रिय पाठिंबा दिला होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 23/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here