..तेव्हा मला सुखद धक्का बसला; आदित्य ठाकरेंचा सभागृहात केसरकरांना टोला

0

मुंबई : शालेय शिक्षण खाते दीपक केसरकरांकडे आले, हे खाते त्यांनी स्वीकारलं तेव्हा मला सुखद धक्का बसला. मी वेगवेगळ्या गोष्टी ऐकून होतो. जुन्या आठवणीही आहेत. मी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी मला प्रेमाचे सल्ले दिले होते खाते न घेण्याबाबत.

शालेय शिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे. देशात शिक्षणाचा अधिकार आहे परंतु दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे. आपल्या देशाला सुपर पॉवर बनवायचं असेल तर हे स्वप्न केवळ शिक्षणाच्या जोरावर पूर्ण होऊ शकतं. प्रत्येक लहान गोष्टींवर विचार केला तर शिक्षणासाठी महाराष्ट्रात नवी संधी उभी करू शकतो असं शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी विधानसभेत म्हटलं. प्राथमिक शिक्षण खात्याच्या पुरवणी मागणीवर ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, शालेय शिक्षणावर बोलताना ३ गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं. विकास, अभ्यासक्रम आणि कौशल्य अभ्यासक्रम, शाळांच्या इमारतीची डागडुजी नसते. रंगरंगोटी नसते. दरवाजे तुटलेले असतात. बाथरुम खराब असते. वर्ग काळोखात असतात. वर्ग कसा असतो यावर लक्ष दिले पाहिजे. पुरेसा प्रकाश वर्गात आहे का हे पाहिले पाहिजे. शाळा उद्धाटन करता बाथरुममध्ये जाळ्या असतात परंतु त्यावर मोठं भोक पडलेले दिसतं. ज्यातून आरपार पाहिलं जाते. टॉयलेट आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था एका भितींवर नको. प्रत्येक शाळेत कॅन्टीन असणे गरजेचे आहे. शिक्षक, स्टाफसाठी बसण्याची योग्य व्यवस्था असावी असं त्यांनी सांगितले.

तसेच शाळेत मातीची मैदानं कमी होत चालली आहे. शालेय इमारतीचा विकास करताना ही मैदानं तयार होतील यावर भर दिला पाहिजे. मुंबईच्या शाळेत आम्ही विविध सुविधा दिल्या. यंदा महापालिकेच्या शाळेत १ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी जास्त झाली आहे. जे आपले शिक्षक आहेत त्यांना वारंवार ट्रेनिंग दिले पाहिजे. हेडमास्टरांना काही प्रमाणात आर्थिक निर्णय घेण्याची ताकद दिली पाहिजे. मिड मे मिलमध्ये फक्त खिचडी दिली जाते. लहान मुलांना वेगवेगळे पौष्टीक आहार दिले पाहिजे. जिल्ह्यांमध्ये सेंट्रल किचनची सुविधा देऊन त्यातून विद्यार्थ्यांना आहार देऊ शकतो असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, शैक्षणिक प्रकारात वेगवेगळ्या गोष्टींचे शिक्षण दिले पाहिजे. सेफ स्कुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षा दिली पाहिजे. शहरासोबत ग्रामीण भागातही यावर लक्ष दिले पाहिजे. मुलांच्या मानसिकतेवर लक्ष दिले पाहिजे असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:40 PM 23/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here