रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात २९ अधिकाऱ्यांसह २२७ पदे रिक्त

0

रत्नागिरी : जिल्ह्याची वाढती लोकसंख्या विचारात घेता जनतेच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पोलिस बळ अपुरेच पडत आहे.

१६ लाखाहून अधिक लोकसंख्या असतान पोलिस मनुष्यबळ केवळ १ हजार ५१३ एवढेच आहेत. सुमारे अकराशे लोकामागे १ पोलिस अशी गंभीर स्थिती जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात पोलिस दलात मंजूर असलेल्या १ हजार ७४० पदांपैकी २२७ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये अधिकाऱ्यांचीच २९ पदे रिक्त असल्याने प्रभारींवर अनेक ठिकाणी कारभार सुरू आहे. यामुळे जनतेच्या सुरक्षिततेचे गणित जुळविताना पोलिस दलाची फरफट होत आहे.

३० ते ३५ वर्षांपूर्वी समुद्र मार्गे झालेल्या सोन्याच्या तस्करीसह किनाऱ्यावर सापडलेल्या ए के ४७ रायफलमुळे जिल्हा गुन्हेगारी जगताच्या नकाशावर आला. त्यानंतर जिल्ह्यात आलेली कोकण रेल्वे, जलमार्ग आदीचा वापर वाढल्याने गुन्हेगारी अधिक फोफावली. मुंबईसह केरळ, बेळगाव आदी राज्य जिल्ह्याच्या जवळ आली. जिल्हा पोलिस दल गुन्हेगारी थोपविण्यासाठी सक्षम असले तरी लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस मनुष्यबळ अगदी कमी आहे. त्यात जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा असल्याने समुद्र मार्गे होणारी घुसखोरी रोखण्याची मोठी जबाबदारी तटरक्षक दलाबरोबर कस्टम आणि पोलिसांचीही आहे. गुन्हे दाखल होण्यात देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुन्हेगारीला जरबघालण्यासाठी पोलिस दल अजून सक्षम करण्याची गरज आहे.

वाढती गुन्हेगारी कमी करण्यासह सण, उत्सव काळातील बंदोबस्त, आंदोलन, सुरक्षा, अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाया, जिल्ह्यात निघत असलेले विविध मोर्चे यांसह अन्य कारणांसाठी पोलिस मनुष्यबळ द्यावे लागते. एकीकडे कामाचा ताण वाढत असताना जिल्ह्यात पोलिसांची विविध वर्गांची २२७ पदे रिक्त आहेत. यामुळे कामाचा ताण अधिक, अनेकांना सुट्ट्या मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे.

पोलिस भरती गेल्या दोन वर्षांत झाली असून विचित्र राजकीय घडामोडीमुळे भरती रखडली आहे. येत्या काळात पोलिस भरती करून रिक्त जागांवर पोलिस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याची गरज आहे. बंदोबस्तासह विविध गु्ह्यातील तपासासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना परराज्यात पाठवण्याची गरजही वाढली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:27 PM 25/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here