“ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला; महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली” : सामना अग्रलेख

0

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

“विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम झाले. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला” असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच “महाराष्ट्रात ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला तसे इतर राज्यांत कोणी वाकायला तयार नाहीत. महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली तसे दिल्लीचे आमदार व त्यांचे नेते पळाले नाहीत. ते भाजपा व ईडीविरोधात ठामपणे उभे राहिले” असं देखील म्हटलं आहे. “संभ्रमित युग! बदनाम कमळ!” या सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

“केंद्र सरकार व त्यांच्या सूत्रधारांना 2024 चे भय वाटते आहे. हे भय केजरीवाल, ममता, उद्धव ठाकरे, नितीश कुमार व शरद पवारांचे आहे. इतके मोठे बहुमत असताना या मंडळींना भय का वाटावे? याचे उत्तर एकच. त्यांचे बहुमत निखळ नाही. ते चोरलेले आहे. धाडसत्र व सूडाची छापेमारी ही त्यांची शस्त्रे. त्याच शस्त्रांनी त्यांचे ‘ऑपरेशन कमळ’ होते, पण कमळाच्या लाभार्थींवर सरकारी छाप्यांचे वार होत नाहीत. देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. पण या न्यायनिवाडय़ास विलंब होऊ नये, एवढीच जनतेची अपेक्षा आहे. अर्थात आज राज्यकर्त्यांचा कारभारच असा सुरू आहे की, देशात एक संभ्रमित युग अवतरले आहे. या संभ्रमित युगात आता कोण अवतार घेणार? नाहीतर जनतेलाच नरसिंहाचा अवतार धारण करावा लागेल” असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

सामना अग्रलेख

  • देशाची परिस्थिती संभ्रमित झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. अशा अनेक संभ्रमित गोष्टींचे सध्या पेव फुटले आहे. सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे असे जे सुरू आहे त्यामुळे विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम झाले. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला. ‘दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन कमळ ‘फेल’ गेले आहे. भाजप उघडा पडला आहे’, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.
  • बिहारमध्येही ‘ऑपरेशन कमळ’ चालले नाही व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी अमित शहा यांना खुले आव्हान दिले की, ”ईडी, सीबीआय वगैरे लावून माझे सरकार पाडून दाखवा.” महाराष्ट्रात ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला तसे इतर राज्यांत कोणी वाकायला तयार नाहीत. सगळ्यांत महत्त्वाची घडामोड दिल्ली राज्यात घडली. ईडी, सीबीआयचा वापर करून केजरीवाल यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘कॅबिनेट’च्या निर्णयाचे खापर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांवर फोडून त्यांच्यावर सीबीआयने धाडी टाकल्या.
  • सिसोदिया हे काही पळून जाणारे गृहस्थ नाहीत, पण एखाद्या गुन्हेगारांप्रमाणे त्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी करून लोकनियुक्त सरकारची मानहानी केली गेली. म्हणूनच देशाची स्थिती संभ्रमित आहे, असे पवार म्हणतात ते खरे आहे. हे सर्व केजरीवाल यांचे सरकार पाडण्यासाठी सुरू आहे. आता मनीष सिसोदिया यांनी भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’वर बॉम्ब टाकला आहे. ”भाजपमध्ये प्रवेश करा, ‘आप’चे आमदार फोडून आणा व मुख्यमंत्री व्हा. तसे केल्यास आपल्या विरोधातील ईडी, सीबीआयची सर्व प्रकरणे बंद करू,” अशी ऑफर भाजपने दिल्याचा दावा सिसोदिया यांनी केला.
  • ‘आप’चे आमदार फोडण्यासाठी वीस-वीस कोटी रुपयांची ‘ऑफर’ दिल्याचा आरोप तर स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच केला आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन कमळ’ हे लोकशाही व स्वातंत्र्यासाठी किती घातक आहे हे किळसवाण्या पद्धतीने समोर आले. महाराष्ट्रात याच पद्धतीने ऑपरेशन केले गेले, पण मोठे राज्य असल्याने व शिवसेना पह्डणे हाच मुख्य अजेंडा असल्याने ईडीचा धाक अधिक पन्नास ‘खोके’ अशी बेगमी केली असे सर्रास बोलले जाते. महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली तसे दिल्लीचे आमदार व त्यांचे नेते पळाले नाहीत. ते भाजप व ईडीविरोधात ठामपणे उभे राहिले.
  • महाराष्ट्रात शिवसेना नेते संजय राऊत हे बेडरपणे ईडीला सामोरे गेले. ”मरण पत्करीन, पण शरण जाणार नाही. मला खोट्या प्रकरणात गुंतवले आहे,” असे संजय राऊत शेवटपर्यंत म्हणाले व तुरुंगात जाणे त्यांनी पसंत केले. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा, नाहीतर ईडीचा फास आवळू, अशा धमक्या त्यांनाही दिल्या गेल्या होत्या. शिवाय राऊत यांनी हा सर्व प्रसंग राज्यसभेचे तत्कालिन सभापती व्यंकय्या नायडू यांनाही कळवला होता. पण सध्या कोण कोणाचे ऐकणार? ना पेशी ना सुनवाई. तारखांचाच खेळ सुरू आहे.
  • ईडी-सीबीआयवाल्यांना आमचा प्रश्न आहे. गेल्या सात-आठ वर्षांत ज्या घिसाडघाईने सार्वजनिक क्षेत्रांच्या कंपन्या, विमानतळांची विक्री झाली त्यातून सरकारचा काय फायदा-तोटा झाला व त्यावर या तपास यंत्रणांनी कोणती कारवाई केली? बिहारात सत्तापरिवर्तन होताच राष्ट्रीय जनता दलावर सीबीआय, ईडीच्या धाडी पडाव्यात हा निव्वळ योगायोग कसा म्हणावा? पण तेजस्वी यादव यांनी थेट सांगितले ”महाराष्ट्रात जे घडले ते बिहारात होणार नाही. बिहार घाबरणार नाही. जे डरपोक आहेत त्यांना ईडी-सीबीआयची भीती दाखवा.”

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 26/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here