रत्नागिरी : मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा हा प्रशासनाच्या अक्षम्य बेपर्वाईचे बोलके उदाहरण आहे. या प्रश्नी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने दंड थोपटले असून मिऱ्यावासीयांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा असा इशारा देण्यात आला आहे. यातून मिऱ्या वासीयांची सुटका माजी खासदार निलेश राणेच करू शकतात त्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे असा निरोप स्वाभिमानच्या पदाधिका-यांनी मिऱ्यावासीयांच्या भेटी दरम्यान दिला. मिऱ्या बंधा-याच्या दुरूस्तीसाठी दोन कोटींची निविदा निघते. जिल्ह्याबाहेरील ठेकेदार नेमण्यात येतो. काही ठराविक पक्षांचे पदाधिकारी यामध्ये ढवळाढवळ करतात. कामाची माहिती नसलेल्या ठेकेदाराला काम दिले जाते. संबंधित ठेकेदाराकडे निविदेला अनुसरुन काम करायला साहित्य नाही. यामागे कोणाचा हात आहे? असा सवाल उपस्थित ग्रामस्थांनी स्वाभिमानच्या पदाधिका-यांकडे केला आणि या प्रश्नी स्वाभिमानने कडक भूमिका घ्यावी, आम्ही न्यायासाठी तुमच्या सोबत येऊ अशी ग्वाही दिली. मिऱ्यावासियांना धूमप्रतिबंधक बंधारा महत्त्वाचा असून तात्पुरती मलमपट्टी न करता शासनाने ठोस भूमिका घ्यावी. दर पावसाळ्यात अनर्थ होईल, या भीतीने येथील जनता रात्रदिवस जागता पहारा ठेवावा लागतो. निसर्गाचे संकट केव्हाही येऊ शकते. म्हणून या प्रश्नी स्थानिक जनतेच्या आग्रही मागणीला आमचा पाठिंबा असून स्थानिक जनतेसोबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कायम राहील, असे तालुकाध्यक्ष अशोक वाडेकर यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, तालुका उपाध्यक्ष ययाती शिवलकर, तालुका उपाध्यक्ष गुरु चव्हाण, शहर अध्यक्ष संकेत चवंडे, समीर तांडेल, स्वानंद शिवलकर, दत्तगुरु कीर, राजेंद्र पुनसकर, विजू गांधी, जितू पुसाळकर, अभिषक साळुखे आदी स्वाभिमानचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
