राज्य उत्पादन शुल्क कडून कारवाईचा धडाका; दीड महिन्यात 190 कारवाया, 124 आरोपींना अटक

0

रत्नागिरी : दीड महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 190 गुन्हे दाखल करत 124 आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये 2 वाहने जप्त करून 42 लाख 06 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. आगामी गणेशोत्सव काळात महामार्गावर गोवा बनावटीच्या दारुसह हातभट्टी दारुविरोधात कारवाई करण्यासाठी 4 पथकं तैनात केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सागर ढोमकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक यापूर्वी होत होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करणार्‍या तस्करांचे कंबरडे मोडून काढले होते. त्यामुळे छूपे मार्ग या तस्करांनी स्विकारले होते. परंतु त्याठिकाणीदेखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळे रचून मोठी कारवाई केली आहे.

जुलै ते ऑगस्ट या कालावधीत रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 190 गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांमध्ये 124 आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. तसेच 2 चारचाकी वाहनेदेखील जप्त केली होती. 190 गुन्ह्यांमध्ये 42 लाख 06 हजार रुपयांचा ऐवज राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे.

2 दिवसांपूर्वी अशीच मोठी कारवाई गुहागर तालुक्यात झाली होती. त्याठिकाणाहून नवसागर, रसायन व हातभट्टीच्या दारुसह 2 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला. भरारी पथकाने ही धडक कारवाई केली होती.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टीसह गोवा बनावट दारूविरोधात मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 4 पथके तैनात केली जाणार आहेत. 2 तपासणी नाके उभारले जाणार असून चिपळूण आणि हातखंबा आदी ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तपासणी नाके कार्यरत राहणार असल्याचे अधिक्षक सागर ढोमकर यांनी सांगितले.

गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्यात 3 दिवस ड्राय डे घोषित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार ड्राय डे जाहीर करण्यात आले आहेत. 31 ऑगस्ट, 5 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर 2022 यादिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील देशी, विदेशी मद्य व माडीविक्री अनुज्ञप्ती केंद्र बंद राहणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:29 PM 26/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here