‘उद्धव ठाकरेंसाठी हा काळ अत्यंत वाईट’; शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीवर भाजपाची प्रतिक्रिया

0

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला आता वेगळी कलाटणी लागणारी युती झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी या युतीची घोषणा केली.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी ब्रिगेडने २०१९मध्ये ४० जागांवर निवडणूक लढवली. त्यांना ०.०६ टक्के मतं मिळाली. उद्धव ठाकरेंना इतकी कमी मतं मिळवणाऱ्या पार्टनरसोबत युती करावी लागत असल्याचं सांगत बावनकुळे यांनी टोला लगावला आहे.

महाराष्ट्रातील कोणताही पक्ष त्यांच्याशी युती करायला तयार नाही. त्यांच्यासोबतचे मित्र त्यांना सोडून पळून जातील. संभाजी ब्रिगेडसोबत जाऊन काही होणार नाही. मात्र हा काळ उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत वाईट असल्याचंही बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं. बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

दरम्यान, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत प्रादेशिक आणि इतर विरोधी पक्षांना संपवण्याची भाषा सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी आणि शिवप्रेमातून शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती झाल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. शिवसेना आाणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येऊन पुढची वाटचाल करावी. महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घ्यावेत. शेतकरी, आदिवासी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी एकत्र काम करावे, अशी इच्छा संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here