शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युती म्हणजे.., फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळं त्यांच्या पक्षाचा काय निर्णय आहे हे मला माहिती नाही. ते मेळावा घेणार की नाहीत याचीही मला कल्पना नाही. उद्धव ठाकरे मेळावा घेणार का नाही याची देखील मला कल्पना नाही. पण गृहमंत्री म्हणून मी एवढच सांगू शकतो की, दसरा मेळाव्याबाबत जे नियमात असेल ते करु असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. एकनाथ शिंदे यांच्याकडून दसरा मेळावा हायजॉक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबाबत फडणवीस यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर विमानतळावर त्याचे आगमन झाल्यावर प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. मात्र, जे नियमात असेल ते करु असे वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. तसेच यावेळी फडणवीसांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसची स्थिती ही बुडत्या नावेसारखी झाली आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. त्यासंदर्भात देखील फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी काँग्रेस म्हणजे बुडती नाव असल्याचे फडणवीस म्हणाले. अनेक लोक काँग्रेस सोडत आहेत. त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर जास्त बोलणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच

दरम्यान, शिंदे गटाकडून शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ हायजॅक करण्याच्या तयारी सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केला असताना, महापालिकेनं मात्र हात आखडता घेतल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केला आणि शिवसेनेत उभी फूट पडली. एकापाठोपाठ एक आमदार, खासदार, नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर आमचीच खरी शिवसेना हा दावा शिंदे गटाकडून केला जाऊ लागला. राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठ्या बंडानं अख्खा महाराष्ट्र हादरला. शिंदे गटाकडून दिवसागणिक नवनवे दावे होऊ लागले. काहीच दिवसांत हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच आता शिवसनेसाठी महत्त्वाचा असलेला दसरा मेळावाच हिसकावण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 27/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here