रत्नागिरी : नव्याने डागडुजी करण्यात आलेल्या जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाला गळती लागल्याचे चित्र आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य रूग्णांना बसत आहे. गळतीमुळे सोमवारी अनेक रूग्णांच्या शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. सर्वसामान्य जनतेला मोफत, अत्यल्प दरात सेवा मिळावी यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय उभारण्यात आले आहे. यातील शस्त्रक्रिया हा विभाग देखील महत्वाचा आहे. शस्त्रक्रिया विभागाची डागडुजी करण्यासाठी हा विभाग बंद ठेवण्यात आला होता. दीड महिन्यापूर्वी हा विभाग रूग्णांच्या सेवेत नव्याने दाखल झाला. या विभागाला गेली दोन दिवस कोसळणा-या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे, ज्या भागामध्ये शस्त्रक्रिया केली जाते. त्याच विभागाला सोमवारी गळती लागली. नव्याने ड्रागडूजी करण्यात आलेल्या भागाला पुन्हा कशी गळती लागली? काम निकृष्ट दर्जाचे झाले की काय? असे विविध प्रश्न रूग्ण व नातेवाईकांमधून उपस्थित होतआहेत. याचा नाहक त्रास मात्र सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. सोमवारी चार ते पाच रूग्णांच्या शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र शस्त्रक्रिया विभागाला गळती लागल्याने ऐनवेळी शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. याबाबतची माहिती खुद्द विभागातील डॉक्टरांनी रूग्णांच्या नातेवाईकांना दिली. शस्त्रक्रिया विभागा बाहेर रूग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतिक्षा कक्ष आहे. मात्र याठिकाणी नादुरूस्त यंत्रसामुग्री ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष द्यावे अशी मागणी रूग्ण व नातेवाईकांमधून होत आहे, याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्याशी संपर्क साधला असता, मुसळधार पावसामुळे शस्त्रक्रिया विभाग गळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आवश्यकता भासल्यास रूग्णालयातील डॉक्टर व सहका-यांची टीम घटनास्थळावर पोहोचणे गरजेचे आहे. याचा विचार करून शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत रूग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येतील असे डॉ. बोल्डे यांनी स्पष्ट केले.
