अण्णा हजारेंचं मद्य धोरणावरुन अरविंद केजरीवालांना खरमरीत पत्र, केजरीवाल म्हणाले…

0

नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहिलं आहे. नवी दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरणावरुन भाजपनं अरविंद केजरीवाल सरकारवर टीका केली आहे. अण्णा हजारेंनी या पत्राच्या माध्यमातून केजरीवालांना १० वर्षापूर्वीच्या एका बैठकीचा दाखला दिला आहे. अरविंद केजरीवालांच्या बोलण्यात आणि कामात फरक आहे, असं अण्णा हजारे म्हणाले. तुमच्या सरकारनं लोकांचं जीवन बर्बाद करणारं मद्य धोरण बनवल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलं.

अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल यांना १८ सप्टेंबर २०१२ रोजी झालेल्या बैठकीचा दाखला दिला आहे. केजरीवालांनी त्यावेळी राजकीय मार्ग स्वीकारण्याची घोषणा केली होती. मात्र, राजकीय पक्ष स्थापन करणं हा आपल्या आंदोलनाचा उद्देश नव्हता,असं अण्णा हजारे म्हणाले. टीम अण्णा यांच्याविषयी जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला होता. देशभर फिरुन लोकशिक्षण आणि लोकजागृतीचं टीम अण्णानं काम करावं, असं मला वाटत होतं. जर, त्या दृष्टीनं काम झालं असतं तर चुकीच्या प्रकारचं मद्य धोरण ठरवलं गेलं नसतं, असं अण्णा हजारे म्हणाले.

अण्णा हजारेंनी सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी त्यांना लोकहितासाठी काम करायला भाग पाडण्यासाठी समविचारी लोकांच्या दबावगटाची अपेक्षा होती. जर तसं झालं असतं तर देशातील चित्र वेगळं दिसलं असतं. गरिबांना लाभ मिळाले असते. मात्र, तसं झालं नाही. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांनी एकत्र येत पक्षाची स्थापना केली. ऐतिहासिक आंदोलनाचं नुकसान करुन राजकीय पक्ष स्थापन केला तो पक्षही इतर राजकीय पक्षांसारखा आहे, असं अण्णा हजारेंनी म्हटलं.
भ्रष्टाचारमुक्त भारत अभियानासाठी ऐतिहासिक लोकायुक्त आंदोलन झालं. त्या आंदोलनात लाखो लोक आले होते. लोकायुक्त असावा यासाठी अरविंद केजरीवालांनी मंचावरुन मोठी भाषणं दिली. तुम्ही आदर्श राजकारणाच्या गोष्टी करत होतात. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री झालात आणि लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याच्या मुद्याला विसरुन गेले. तुमच्या उत्पादन शुल्क धोरणामुळं तुमच्या बोलण्यात आणि कामात फरक असल्याची टीका अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवालांना पत्र लिहून केली आहे.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले ?
अरविंद केजरीवालांनी अण्णा हजारेंनी लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेत्यांनी मद्य धोरणामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. सीबीआयनं घोटाळा नसल्याचं म्हटलं आहे. जनता पण त्यांचं ऐकत नाही. आता ते अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहेत, हे सर्वसाधारण राजकारण असल्याचा टोला केजरीवालांनी लगावला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:45 PM 30/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here