मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणरायाच्या दर्शनासाठी ‘शिवतीर्थ’वर जाणार

0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. आज दुपारी साडे चार वाजता एकनाथ शिंदे गणपती दर्शनाच्या निमित्तानं राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. काल मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी गणपती दर्शनाच्या निमित्तानं राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट दिली होती. यापूर्वी विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती. राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आहे. आणि मुंबई महापालिकेसाठी मनसे-भाजप युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जर शिवतीर्थाला भेट दिली, तर ही भेट फक्त गणपती दर्शनापुरती मर्यादीत असेल की, त्यात नवी राजकीय समीकरण दडली आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपच्या अनेक नेत्यांकडून राज ठाकरेंची भेट

आज एकनाथ शिंदे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली. परंतु दोघांनीही या भेटीबाबतचं वृत्त नाकारलं होतं. त्यानंतर त्याच दिवशी दुपारच्या सुमारास विनोद तावडे हे राज यांच्या भेटीसाठी पोहोचले आणि त्यांच्यात खलबतं झाली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. याआधी नितीन गडकरी, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का असेही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर नवीन समीकरण?

शिवसेनेने साथ सोडल्यानंतर मनसे आणि भाजप युती होणार अशीच राज्यात चर्चा होती. याला आणखी खतपाणी मिळालं ते मनसेने भाजपला राज्यसभा, विधानपरिषद आणि शिंदे फडणवीस सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे. त्यानंतर पुढे देखील हिच चर्चा कायम असल्याची पाहायला मिळालं. त्यातच गेल्या काही दिवसात भाजप आणि मनसे यांची जवळीक वाढली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही नवी समीकरणे जुळतात का याबद्दल चर्चा आहेत. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांना पूरक भूमिका बघायला मिळतात. हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यापासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक वाढली आहे. याआधी चंद्रकांत पाटील यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि मनसेच्या गोटात काही शिजतंय का? याची चर्चा रंगली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 01/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here