10, 12वी पुरवणी परीक्षेचा आज निकाल; दुपारी १ वाजता ऑनलाइन पाहता येणार

0

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवार, २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.

शिक्षण मंडळातर्फे २७ जुलै ते २४ ऑगस्ट या कलावधीत दहावी, बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होणार आहेत. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसांपासून दहावी, बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने शाळा, महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

गुण पडताळणीसाठी करा अर्ज
गुणपडताळणीसाठी ३ ते १२ सप्टेंबरपर्यंत व छायाप्रतीसाठी ३ ते २२ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असेल.

ही असेल अंतिम संधी
मार्च-२०२२ मध्ये प्रथम नोंदणी करून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार योजनेतंर्गत परीक्षेस पुन्हा प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्च-२०२२ परीक्षेसाठी प्रथमच प्रविष्ट झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारसाठी मार्च २०२३ परीक्षा ही अंतिम संधी असणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 02/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here