10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग पिछाडीवर

0

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे.

मार्चमध्ये झालेल्या दहावी व बारावी परीक्षेत कोकण विभाग निकालात प्रथम क्रमांकावर राहिले आहे. पुरवणी परीक्षेत बारावीच्या निकालात कोकण विभाग पिछाडीवर आहे. तर दहावीच्या परीक्षेत सहाव्या क्रमांकावर आहे.

कोरोना नंतर प्रथमच विद्यार्थ्यांच्या मार्च/एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जून मध्ये लागला होता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, वर्ष वाया जावू नये यासाठी जुलै/ऑगस्टमध्येच पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहेत. जुलै/ऑगस्टमध्ये झालेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. कोकण विभागाचा बारावी परीक्षेचा निकाल सर्वात कमी अर्थात २५.६६ टक्के लागला आहे. कोकण विभागातील एकूण ५ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. ४५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती पैकी ४५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ३०.१७ टक्के, कला शाखेचा ८.५१ टक्के, वाणिज्य शाखेचा ३५.८६ टक्के तर व्यावसायिक विषयाचा २७.२७ टक्के निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल कला शाखेचा लागला आहे.

राज्याच्या निकालाच्या आकडेवारीत कोकण विभाग सर्वात मागे असून २५.६६ टक्के इतका निकाल आहे. सर्वात जास्त औरंगाबाद विभाग ४८ टक्के, व्दितीय क्रमांकावर लातूर विभाग ४२.८८ व तृतीय क्रमांकावर नागपूर विभाग ३९.१३ टक्के आहे.

दहावी परीक्षेत सहाव्या क्रमांकावर
दहावीच्या परीक्षेतही आघाडीवर असणाऱ्या कोकण बोर्डाचा पुरवणी परीक्षेत मात्र सहावा क्रमांक आहे. कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील ४ व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोन केंद्रावर परीक्षा घेण्यात आल्या. एकूण १२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पैकी ११८ विद्यार्थी परीक्षेला बसले असता अवघे ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ३५.५९ टक्के लागला आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार निकालात कोकण सहाव्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांक लातूर विभागाचा ५१.७४ टक्के, व्दितीय क्रमांक नागपूर विभाग ४५.६५ टक्के, तृतीय क्रमांकांवर औरंगाबाद विभाग ३९.७६ टक्के आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून २२.६२ टक्के आहे.

दहावीच्या पुरवणी परीक्षेत रत्नागिरी केंद्रावर एक गैर प्रकार आढळला असून त्या विद्यार्थ्याची पुरवणी परीक्षेतील त्या विषयाची संपूर्ण संपादणूक रद्द करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 03/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here