गणेश विसर्जनाच्यावेळी राजापूरचा आठवडा बाजार राहणार बंद

0

राजापूर : गणेश विसर्जनाच्यावेळी शहरातील बंदरधक्का परिसरामध्ये गर्दी होऊ नये आणि या कालावधीमध्ये बंदरधक्का परिसर स्वच्छ आणि सुंदर रहावा या उद्देशाने येत्या गुरूवार दि. ८ रोजी भरणारा आठवडा बाजार त्या दिवसासाठी बंद करण्यात आला आहे. त्या बाबतची माहिती नगर पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गणेशोत्सवाची धामधूम सध्या जोरात सुरू आहे. श्री गणरायाचे भक्तांच्या घरी आगमन झाले असून, गणरायाच्या वास्तव्याने सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सव काळामध्ये गणेश भक्तांना कोणताही त्रास होऊ नये, सुरळीतपणे गणेश विसर्जन व्हावे यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिकेकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्यातून, विविध सोयीसुविधांची उभारणी करण्यात आली आहे.

बंदरधक्का परिसरातील गणेश घाटाचीही स्वच्छता करण्यात आली असून, त्या ठिकाणी कृत्रिम तलावाची उभारणीही करण्यात आली आहे.

शहरातील बंदरधक्का परिसरामध्ये आठवडा बाजार भरत असून, त्याच परिसरामध्ये गणेश विसर्जन घाट आहे. गुरुवारी (ता.८) शहरातील काही सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे.

राजापुरातील बंदरधक्का परिसर आणि गणेश घाटावर भक्तांची गर्दी होणार आहे. त्याचवेळी या परिसरामध्ये आठवडा बाजार सुरू राहिल्यास गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. शहरात भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे त्या परिसरामध्ये कचरा पसरून अस्वच्छता निर्माण होण्याची शक्यता आहे.

या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन येत्या गुरुवार दि. ८ रोजी बंदरधक्का परिसरामध्ये भरणारा आठवडा बाजार त्या दिवसासाठी बंद करण्यात आला आहे. याला सर्व व्यापाऱ्यांसह राजापूरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here