गणपतीपुळे समुद्रातील 50 मीटर भाग ‘रेड झोन’ घोषित

0

रत्नागिरी : पाच दिवसांपुर्वी गणपतीपुळे किनारी पुण्यातील बुडणार्‍या पर्यटकाला स्थानिकांनी वाचवले, मात्र पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी गणपतीपुळे पोलिस चौकीच्या मागील बाजूस किनार्‍यावरील पन्नास मीटर भाग रेड झोन ठरवण्यात आला आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना पोहण्यासाठी मनाई केली असून होमगार्ड, पोलिसांसह जीवरक्षकांची करडी नजर ठेवण्यात आली आहे.

गणपती आगमनाच्या दिवशी पर्यटकाला गणपतीपुळे किनार्‍यावरील स्थानिक व्यापार्‍याने जीव धोक्यात घालून वाचवले होते. सुमारे एक तासाहून अधिक काळ हा थरार सुरु होता. शासकीय सुट्टी असल्यामुळे किनार्‍यावरील जीवरक्षकही सुट्टीवर होते. पावसाळी वातावरणामुळे समुद्राच्या पाण्याला करंट असून किनारी भागात लाटांचा जोर अधिक आहे. पर्यटकांनाही सुरक्षिततेसाठी आवाहन केले जाते; परंतु पर्यटक त्याकडे कानाडोळा करतात. गणपतीपुळे पोलिस चौकीच्या मागील बाजूस चाळ पाण्यामध्ये (खड्डा) तयार होत आहे. भरती-ओहोटीच्या कालावधीत ही परिस्थिती निर्माण होते. त्यामध्ये पोहणारा पर्यटक सापडला की तो खोल समुद्राकडे ओढला जातो. याच परिसरात 31 ऑगस्टला तो पर्यटक बुडाला होता. सध्या पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने जयगड पोलिस ठाण्यातर्फे चाळ निर्माण होणारा परिसर पोहण्यास धोकादायक म्हणून रेड झोन जाहीर केला आहे. सुमारे पन्नास मीटरचा तो भाग असून तेथे पर्यटकांनी पोहण्यास जाऊ नये असे आवाहनही केले आहे.

रेड झोन दर्शविण्यासाठी लाल रिबीन बांधून ठेवण्यात आली आहे. तेथे दिवसभरात दोन होमगार्डस् नियुक्त केले असून पोलिसांचे पेट्रोलिंग सुरु केले आहे. तेथे पोहायला जाण्यास कोणी हट्ट करत असले तर त्याची माहिती पोलिसांना कळवा अशा सुचना जीवरक्षक, सागररक्षकांना केल्या आहेत. गर्दी वाढली तर जेट स्कीचा वॉचही ठेवला जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 06/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here