जनावरांमधील लंपी स्किन आजाराबाबत सावधगिरीचे आवाहन

0

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या वर्षी लंपी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव झालेली जनावरे आढळली होती. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव यावर्षीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोग प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने लंपी स्किन डिसीजची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा, असे आवाहन आवाहन रत्नागिरी पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.

या आजाराचा प्रादुर्भाव मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, चिलटे, पिसवा तसेच बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारा-पाणी यांच्यामार्फत होतो. हा विषाणूजन्य त्वचारोग असून हा रोग मुख्यत्वे गाई- म्हशींमध्ये आढळतो. विदेशी वंशाच्या आणि संकरित वंशाच्या गाईमध्ये देशी वंशाच्या गाईपेक्षा रोगबाधेचे प्रमाण अधिक आढळून येते. उष्ण आणि दमट हवामान रोगप्रसार होण्यास अधिक पोषक असते. या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी जनावरांचे डोळ्यांतील पाणी, नाकातील स्राव, लाळ इत्यादी विविध स्राव हा विषाणू बाहेर पडून चारा आणि पाणी दूषित होऊन इतर जनावरांना या रोगाची लागण होऊ शकते. या रोगामध्ये अंगावर १० ते २० मीमी व्यासाच्या गाठी येतात. सुरवातीस भरपूर ताप, डोळ्यांतून, नाकातून चिकट स्राव, चारा-पाणी खाणे कमी अथवा दूध उत्पादन कमी व काही जनावरांत पायावर सूज येणे, लंगडणे यासारखी लक्षणे दिसून येतात. रोगी जनावरे अशक्त होत जातात, त्यांचे दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते. तसेच काही वेळा गर्भपात होतो. प्रजननक्षमता घटते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. या वर्षी राजस्थानमध्ये या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे.

आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, चिलटे, पिसवा यांच्यामार्फत होत असल्याने कीटकनाशक औषधांचा गोठ्यात ग्रामपंचायतीमार्फत फवारा मारण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा, रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्यतो दुसऱ्याच्या गोठ्यात जाणे टाळावे. नवीन जनावरे खरेदी केली असतील तर त्यांना १५ दिवस विलगीकरणामध्ये ठेवावे तसेच गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी. दिवसातील २-३ तास जनावरांना कोवळ्या उन्हामध्ये ठेवावे. तसेच आजारावरील लस आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखन्याशी संपर्क करून उपलब्ध असल्यास लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:34 PM 08/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here