नवी दिल्ली : भारतीय संघाने टी20 मालिकेत विंडिज संघावर दणदणीत विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली. भारताने मंगळवारी गयाना येथे झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात विंडिजवर 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 ने विंडिजला क्लिन स्वीप केले. तत्पूर्वी, सामन्याला उशिरा सुरुवात झाल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विंडिज संघाने पोलार्डच्या (58) अर्धशतकी खेळीच्या बळावर निर्धारित 20 षटकांते 6 गड्यांच्या मोबदल्यात 146 धावा केल्या. प्रत्युत्तरात कर्णधार विराट कोहली (59) आणि रिषभ पंतच्या नाबाद 65 धावांच्या (42 चेंडू, 4 चौकार, 4 षटकार) बळावर भारताने विसाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विजय साजरा केला. भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात 150 धावा केल्या. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून धोनीचा पर्याय म्हणून पाहण्यात येत असणाऱ्या रिषभने शेवटच्या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात केवळ 4 धावांच्या मोबदल्यात विंडिजचे 3 गडी टिपणारा दीपक चहर सामनावीरचा मानकरी ठरला. चहरने सामन्यात 3 षटके टाकली. तर मालिकेत अष्टपैलू खेळी साकारणारा क्रुणाल पांड्या मालिकावीरचा मानकरी ठरला.
