रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील ‘तारली’ माशाच्या प्रमाणात मोठी घट

0

रत्नागिरी : बांगड्याप्रमाणे आधी फार खाल्ला न जाणाऱ्या तारली माशाला मागील काही काळात मागणी वाढली आहे.

मात्र मागील काही वर्षात तारलीचे प्रमाण सातत्याने क़मी अधिक होताना दिसत आहे. हा मासा केरळ किनारपट्टीवर आढळतो. रत्नागिरी जिह्याच्या किनारपट्टीवर थव्याने आढळणारा हा मासा गेल्या काही वर्षांत कमी प्रमाणात आढळत आहे. हा मासा थव्याने निवास करत असल्यामुळे पर्ससीनसारख्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने त्याचे प्रमाण घटत असल्याचे सांगितले जाते. याचे आणखीही एक कारण आहे. तारलीचे मुख्य खाद्य म्हणजे वनस्पती प्लवंग. याउलट बांगडा माशाचे मुख्य खाद्य प्राणी प्लवंग आहे. यामुळे बांगडा मोठ्या प्रमाणात मिळतो तेव्हा तारली कमी व तारली जास्त तेव्हा बांगडा कमी मिळतो.

प्राणी प्लवंग वाढते तेव्हा वनस्पति प्लवंग क़मी होते आणि वनस्पती प्लवंग वाढते तेव्हा प्राणी प्लवंग कमी होते. हा मासा केरळच्या समुद्रात थव्याने आढळतो व तेथून तो स्थलांतर करतो. मात्र केरळमध्ये या माशाला पकडण्याचा किमान आकार 10 सेंटिमीटर असल्याने लहान मासा मोठ्या प्रमाणात पकडला जातो. त्यामुळे तो रत्नागिरीकडे येईपर्यंत नगण्य संख्येत असतो. गेल्या 3 वर्षात केरळातून फारसे मासे गोवा, कोकणाकडे आले नाहीत. अशा विविध कारणांमुळे तारलीचे प्रमाण वर्षागणीक घटत चालले आहे.

कसा असतो तारली मासा?
तारली माशाचे शात्रीय नाव ”सार्डिनेला लाँगिसेप्स” असून भारताची पश्चिम किनारपट्टी, श्रीलंका, पाकिस्तान, इराण, ओमान, फिलिपिन्स, सोमालिया, व्हिएतनाम आणि येमेन देशांच्या किनारपट्टीला हा मासा आढळतो. त्यापासून तेल मिळते, त्याला इंग्रजीत ”ऑइल सार्डीन” म्हणतात. त्याचे शरीर लांबट आणि दोन्ही टोकांकडे निमुळते व दोन्ही बाजूंनी चपटे असते. डोक्यापासून शेपटीपर्यंत पाठीकडची कडा सरळ तर पोटाची कडा फुगीर असते. पोटावरील कडेवर धारदार खवल्यांची रांग असते. पाठीचा रंग काळपट चंदेरी असून त्यात सोनेरी चमक दिसते. पोट रूपेरी असून त्यावर जांभळ्या रंगाची तकाकी असते. पृष्ठपर आणि पुच्छपर हिरवट तपकिरी रंगाचे असतात. हा मास 20-23 सेंमी लांब व 200 ग्रॅम पर्यंत वाढतो. पकडले गेलेले मासे 12-15 सेंमी लांब असतात. नर आणि मादी यांच्या बाह्यस्वरूपात फारसा फरक नसतो.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 09/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here