याकूब मेमन कबर सुशोभीकरणप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

0

मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा झालेला याकूब मेमन याच्या कबरीच्या कोरोनाकाळात झालेल्या सुशोभीकरणावरून आता राज्यात नवा वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहे.

सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधक महाविकास आघाडीत जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

पेंग्विन सेना वानखेडे मैदान उखडायला गेली होती. मग आता याकूब मेमनची कबर उखडून दाखवावी. सुशोभीकरणास महाविकास आघाडी सरकारची अलिखित परवानगी होती, असा आरोप करत भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी, अशी आग्रही मागणी केली आहे. त्यावर याकूब मेमनचा मृतदेह दफनविधीसाठी का दिला, असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर पलटवार केला आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.

कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत

एकनाथ शिंदे म्हणाले की, महापालिकेला सूचना दिल्या आहेत. याकूब हा स्फोटातील आरोपी असून त्याला फाशी दिली आहे. त्याचे उदात्तीकरण महाराष्ट्र खपवून घेऊ शकत नाही. त्यामुळे कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

तत्पूर्वी, मैदाने, उद्याने, स्मशानभूमीच्या सुशोभीकरण, देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची असते. महापौर शिवसेनेचा होता व मुख्यमंत्रीपदी ठाकरे होते. मग कबरीच्या सुशोभीकरणासाठी ठाकरे यांनी परवानगी कशी दिली, असा प्रश्न मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला. नवाब मलिक, अस्लम शेख व तुकडे तुकडे टोळीला खूश करण्यासाठी हे करण्यात आल्याचा आरोप शेलार यांनी केला.

दरम्यान, दक्षिण मुंबईतील मरिन लाइन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली होती. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते. यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून, एलईडी लाईट्स काढून टाकल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:29 PM 09/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here