पोलिस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे तीन मच्छीमारांना जीवदान; वेळणेश्वर येथील घटना

0

रत्नागिरी : गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तावर असलेले पोलीस कादवडकर यांच्या प्रसंगावधानामुळे वेळणेश्वर (ता. गुहागर) समुद्रात बुडालेल्या नौकेतील तिन्ही मच्छीमारांना वाचविण्यात यश आले.

वेळणेश्वरच्या समुद्रात शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमाराला मेरूमंडल (स्मशानाजवळील परिसर) येथील खडकाळ भागात एका लाटेने कोंडकारूळ येथील मच्छीमार नौका उलटली. कोंडकारूळचे यशवंत गंगाजी झर्वे (वय ५८, रा. जांभुळवाडी), संजय लक्ष्मण जागकर (वय ४०, रा. लक्ष्मीनगर) आणि विलास लक्ष्मण जागकर (वय ६२, रा. नामदेववाडी) हे तिघे मच्छीमार शुक्रवारी दुपारी एक वाजता छोटी मच्छीमार नौका घेऊन वेळणेश्वरच्या दिशेने मच्छीमारीसाठी निघाले होते. सायंकाळी पावणेचारच्या दरम्यान त्यांची नौका मेरूमंडल या खडकाळ भागात आली. वाऱ्यामुळे नेहमीपेक्षा उंच लाटा येत होत्या. अशाच एका लाटेने नौका अचानक उलटली. तिन्ही मच्छीमार समुद्रात पडले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला.

दरम्यान अनंत चतुर्दशीमुळे समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी गुहागर पोलीस ठाण्यातील पोलीस कादवडकर त्यांच्या काही सहकाऱ्यांसह समुद्रावर उपस्थित होते. समुद्रात मच्छीमारांनी केलेला आरडाओरडा कादवडकरांच्या लक्षात आला. तातडीने त्यांनी वेळणेश्वरचे सरपंच चैतन्य धोपावकर यांना ही बाब सांगितली. लगेचच धोपावकर यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली आणि या तिन्ही मच्छीमारांना सुखरूप समुद्रकिनाऱ्यावर आणले. कादवडकर यांच्या प्रसंगावधानामुळे आणि वेळणेश्वरचे सरपंच व ग्रामस्थ यांनी केलेल्या मदतकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मच्छीमारांना समुद्रकिनाऱ्यावर आणल्यानंतर समुद्रात बुडालेली नौका बाहेर काढण्याचे प्रयत्न स्थानिक मच्छीमारांनी सुरू केले. मात्र लाटांमुळे त्यात व्यत्यय आला. छोटी नौका बुडाल्याने मच्छीमारांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 10/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here