काँग्रेस पक्ष कायमच विकासाच्या बाजुने : नाना पटोले

0

राजापूर : कोकणाचा विकास व्हावा ही सर्वांची मनापासून इच्छा आहे. काँग्रेस पक्ष हा नेहमीच विकासासोबत राहिलेला आहे. विकासाच्या गोष्टी येतात तेथे काँग्रेस पक्ष पुढे येतो. काँग्रेस पक्ष विकासासोबत राहिलेला आहे आणि राहणार आहे. रिफायनरी प्रकल्पावरून सध्या समर्थन आणि विरोध असा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून रिफायनरीचा हा वाद जवळून बघण्यासाठी व त्याला कसे सोडवता येईल यासाठी आपला दौरा असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी रिफायनरी समर्थकांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले.

कोकणाला निसर्गाने भरभरून दिलेले आहे. मात्र कोकणातील तरूणांना आपला गाव आपला तालुका सोडून चाकरमानी म्हणून मुंबईला का जावे लागते याचा विचार देखील करणे आवश्यक बनले आहे. माजी मंत्री भाईसाहेब हातणकर यांनी कोकणाला पुढे नेण्यासाठी केलेले काम आजही कोकणातील जनता विसरलेली नाही. आम्ही तरूण पिढी हाच वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करीत आहोत. मुंबईत येऊन कोणी काय सांगावे आणि वस्तूस्थिती नेमकी काय आहे ही जवळून पाहण्यासाठी आपण येथे आल्याचे यावेळी पटोले यांनी सांगीतले.

यावेळी धोपेश्वर – बारसू येथील स्थानिक जमीनमालकांनी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी आम्ही आमची साडेतीन हजार एकर जमीन देऊ केल्याची माहिती पटोले यांना दिली. काही एनजीओ आणि जमीनमालक नसलेले लोक प्रकल्पाला विरोध असल्याचे भासवत आहेत याकडे बारसूतील ग्रामस्थ विनायक कदम यांनी पटोले यांचे लक्ष वेधले. तर रिफायनरी प्रकल्प समर्थक समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर यांनी केवळ धोपेश्वर बारसू आणि गोवळ या दोन गावांत प्रकल्प साकारू शकत असल्याने प्रकल्पाला विरोध करणारी शिवणेखुर्द,देवाचेगोठणे आणि सोलगांव ही गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी श्री. पटोले यांच्याकडे केली. यावेळी बोलताना नंदकुमार चव्हाण, पंढरीनाथ आंबेरकर, एजाज बांगी यांनी जमीनमालकांची संमती असल्याने व प्रकल्पाला विरोध करणारी एकाही जमीनमालकाची लेखी तक्रार नसल्याने नेमका विरोध कोणाचा आहे ते तपासण्यात यावे अशी मागणी केली. नंदकुमार चव्हाण यांनी जातीपातीच्या राजकारणात प्रकल्पाला गुरफटवल्यास कोकणात वेगळाच पायंडा पडेल असे सांगीतले.

यानंतर पटोले यांनी प्रकल्प समर्थकांशी संवाद साधला, नाणारचा विषय कसा गायब झाला हे सगळयांना माहित आहे. आता नव्या जागेत रिफायनरीचे नवे बाळ जन्माला आले आहे त्याठिकाणीही समर्थन – विरोध अशी स्थिती आहे. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून रिफायनरीचा वाद जवळून बघण्यासाठी व त्याला कसे सोडवता येईल यासाठी आजचा आपला दौरा असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी नाना पटोले यांच्यासोबत काँग्रेसच्या माजी आमदार अॅकड. सौ. हुस्नबानू खलिफे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, माजी नगराध्यक्ष अॅजड. जमीर खलिफे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर पटोले यांनी गोवळ भागात प्रकल्प विरोधकांशी संवाद साधला. यावेळी प्रकल्प विरोधकांनी आपली भुमिका मांडली ती देखील पटोले यांनी ऐकून घेतली. यावेळी प्रकल्प विरोधकांनी रिफायनरी नकोचा नारा दिला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 12/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here