स्थानिक जनतेची माथी भडकवण्याऱ्या एनजीओंना जशास तसे उत्तर दिले जाईल; रिफायनरी प्रकल्प समर्थकांचा इशारा

0

राजापूर : प्रकल्प विरोधाची सुपारी घेतलेली काही एनजीओ व अन्य मंडळी प्रकल्प काय आहे हे समजून न घेता रिफायनरी प्रकल्प परिसरातील गोर गरीब, भोळ्याभोबडया महिला भगिनींची ढाल करून त्यांची माथी भडकवण्याचे काम करत असतील तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. आणि प्रकल्पावरून आमच्या नेत्यांवर केलेली टीका, टिप्पणी त्यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा ईशारा मंगळवारी रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी दिला आहे.

धोपेश्वर बारसू परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या नरेंद्र उर्फ अपन जोशी तसेच सत्यजीत चव्हाण व नितीन जठार यांना अटक करावी अशी मागणी करत मंगळवारी भाजपा, शिवसेना शिंदे गट व शेकडो प्रकल्पसमर्थकांनी राजापूर पोलिस ठाण्याला धडक दिली. यावेळी प्रकल्प समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करीत रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत गोवळ येथे झालेल्या प्रकल्प विरोधी सभेत राज्याचे उद्योगमंत्री उदय
सामंत यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केलेप्रकरणी नरेंद्र उर्फ अपन जोशी तसेच सत्यजीत चव्हाण व नितीन जठार यांच्या विरोधात राजापूरचे माजी नगरसेवक सौरभ खडपे यानी राजापूर पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर गोवळ परिसरातील महिलांनी राजापूर पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठया संख्येने गर्दी करत पोलिस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर मंगळवारी भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि शेकडो रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी राजापूर पोलिस ठाण्याला धडक देत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या नरेंद्र उर्फ जोशी, प्रकल्प विरोधी एनजीओ म्हणून काम करणाऱ्या सत्यजीत चव्हाण व नितीन जठार यांना अटक करावी अशी मागणी केली. तर प्रकल्प विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदु चव्हाण, राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, माजी नगसेवक सौरभ खडपे, डॉ. सुनिल राणे, ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष अशफाक हाजू, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, अविनाश महाजन, राजा काजवे, विनायक कदम, दिपक बेंद्रे,रविकांत रूमडे, विद्याधर राणे, अरविंद लांजेकर, अमर वारिशे, राजा खानविलकर, लांजा भाजपाचे मुन्ना खामकर, संजय यादव, बाबा लांजेकर, फारूख साखरकर, आशिष मालवणकर, संदेश आंबेकर, समीर शिंदे तसेच नरेंद्र कोंबेकर, विजय हिवाळकर, उल्हास खडपे, संकेत खडपे, सुशांत मराठे आदींसह शेकडो प्रकल्प समर्थक उपस्थित होते.

…तर करेक्ट कार्यक्रम करू-गुरव

यावेळी प्रकल्प समर्थकांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना भाजपा तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी प्रकल्प विरोधकांचा समाचार घेतला. महिलांना पुढे करून प्रकल्प विरोधकांचा जो काही माथी भडकावण्याचा प्रकार सुरू आहे तो खपवून घेतला जाणार नाही. कालच्या घटनेच्या वेळी आम्ही प्रकल्पसमर्थक या ठिकाणी नव्हतो. तरीही त्यांना चांगले उत्तर दिलेले आहे मात्र यापुढे महिलांना पुढे करून जर कोणी धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर यापुढे त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल असा परखड ईशारा अभिजीत गुरव यांनी प्रकल्पविरोधकांना दिला.

…तर जशास तसं उत्तर देवू-नंदू चव्हाण

यावेळी बोलताना भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदु चव्हाण यांनी प्रकल्प विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला सर्वपक्षीय मान्यता मिळत असताना काही ठरावीक राजकीय मंडळी जाती पातीचे राजकारण करून विशिष्ट समाजाला सोबत घेऊन समाजाचे राजकारण करत आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पक्षीय मतभेद असून शकतात मात्र वैयक्तिक मतभेद असू नयेत. यापुर्वीही या प्रकल्प विरोधकांनी भ्याड पध्दतीने महिलांना पुढे करून निलेश राणे यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी निलेश राणे यांनी प्रकल्पाबाबतची भुमिका स्पष्ट केली होती. लोकशाही मार्गाने तुम्ही तुमचा विरोध नोंदवा. मात्र जर कोणी आमच्या नेत्यांना धमक्या देत असेल त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करेल तर जशास तसं उत्तर दिले जाईल असा ईशारा दिला.

ज्यांच्या जमिनी जात नाही ते विरोध करत असतील खपवून घेतले जाणार नाही-काझी तर राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी यांनी प्रकल्पल विरोधकांना भडकावणाऱ्या एनजीओंना जशास तसे उतर दिले जाईल. जर स्थानिक म्हणून लोकांना विरोध करायचा असेल तर त्यांनी लोकशाही मार्गाने करावा. मात्र महिलांची ढाल करून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. या प्रकल्पासाठी आम्ही स्वच्छेने जमीनी दिलेल्या आहेत. ज्यांच्या जमिनी नाहीत ते विरोध करत आहेत आणि लोकांना नाहक भडकावत आहेत. त्यामुळे कोणाच्या जागा जातायेत ते पाहून प्रशासनाने विरोध लक्षात घ्यावा. या प्रकल्पामुळे येथील बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे केवळ माथी भडकावून, धमक्या देवून ही मंडळी जर आम्हाला गृहीत धरतील असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. प्रकल्प समर्थकांना, लोकप्रतिनिधींना धमकावण्याचा प्रयत्न केला जाणार असेल, त्यांची बदनामी केली जाणार असेल पंचक्रोशीत फिरण्याची बंदी घातली जाणार असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो अशा शब्दात काझी यांनी प्रकल्प विरोधकांचा समाचार घेतला.राजापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी रिफायनरी हवी आहे अशा शब्दात काझी यांनी प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले.

यावेळी डॉ. राणे यांनी प्रकल्प विरोधी प्रचार करणान्यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी. एनजीओ मंडळी येथील गरीब जनतेची माथी भडकावत आहेत. या ठिकाणी कोणताही प्रकल्प आला की ही मंडळी येथे ठाण मांडून बसत आहेत. यांच्या उद्योग व्यवसायाची पडताळणी करावी. केवळ जनतेच्या मनात प्रकल्प विरोधाचे विष कालवण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. प्रशासनाच्या यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी डॉ. राणे यांनी केली.

सोमवारी गोवळ बारसू परिसरातील महिलांनी मोठया संख्येने जमाव करून प्रशासनावर दबाव आणण्याच्या केलेल्या प्रयत्नानंतर मंगळवारी प्रकल्पसमर्थकांनी राजापूर पोलिस ठाण्यावर धडक देत प्रकल्प समर्थनाचा नारा दिला. त्यामुळे आगामी काळात प्रकल्प विरोधक विरूध्द प्रकल्प समर्थक असा सामना रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:57 PM 13/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here