नवी दिल्ली : राज्यसभेचे बुधवारी पार पडलेले अधिवेशन गेल्या १७ वर्षातले सर्वोत्तम अधिवेशन ठरले असल्याची माहिती या सदनाचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी दिली. अधिवेशनामध्ये ३५ कामकाजी दिवसात ३२ विधेयके मंजूर झाली असल्याचेही ते म्हणाले. राज्यसभेच्या २४९ व्या अधिवेशनाचे सूप बुधवारी वाजले. संसद अधिवेशन सुरू होत असताना नेहमी सत्ताधार्याकडून अधिवेशनाचे कामकाज चालवण्यासाठी विरोधकांना सहकार्याचे आवाहन केले जाते. तथापि बरीचशी अधिवेशने गदारोळामुळे वाया जातात. यावेळचे अधिवेशन त्याला अपवाद ठरले आहे. ही एक नवी सुरुवात असून आगामी काळातही अशाच चांगल्या पद्धतीने कामकाज होणे गरजेचे असल्याची अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली.नुसता गदारोळ होण्याऐवजी संसदेत कामकाज चालावे आणि देशहिताचे निर्णय व्हावेत, ही सामान्य जनतेची अपेक्षा असते, या अपेक्षेची पूर्तता होणे, ही निश्चितपणे चांगली बाब असल्याचे सांगितले. नायडू पुढे म्हणाले की, गेल्या १७ वर्षांच्या काळात राज्यसभेची ५२ अधिवेशने झाली, मात्र उत्पादकतेच्या दृष्टीने आज पार पडलेले अधिवेशन सर्वाधिक यशस्वी ठरले आहे. मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकपासून मुक्ती देणारे विधेयक तसेच जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन विधेयक मंजूर होणे, राज्यसभेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या ही दोन्ही विधेयके आगामी काळात मैलाचा दगड ठरणार आहेत. संसद अधिवेशनाचे कामकाज म्हणजे नेमके काय, हेही गेल्या काही दिवसात जनतेला दिसून आले आले आहे. याआधी राज्यसभेच्या १३१ व्या अधिवेशनात म्हणजे १९८४ साली सर्वाधिक यशस्वी अधिवेशन झाले होते. त्यावेळी राज्यसभेत ३७ विधेयके मंजूर झाली होती. त्यानंतर २००२ साली राज्यसभेच्या १९७ व्या अधिवेशनात ३५ विधेयके मंजूर झाली होती. गेल्या ४१ वर्षाचा विचार केला, तर कामकाज उत्पादकतेच्या दृष्टीने ताजे अधिवेशन पाचव्या क्रमांकाचे सर्वात यशस्वी अधिवेशन ठरले आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच अधिवेशनामध्ये सरकारला केवळ ३३ विधेयके मंजूर करून घेता आली होती. या ५ अधिवेशनामध्ये राज्यसभेची कामकाज उत्पादकता ७.४४ टक्के ते ६५.६० टक्के इतकी राहिली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपलब्ध वेळेचा विचार केला तर एकूण वेळेच्या तुलनेत १०४.९२ टक्के इतके कामकाज झाले. गेल्या पाच वर्षांच्या काळात पहिल्यांदाच राज्यसभेने वेळेचा पुरेपुर उपयोग केला, असे नायडू म्हणाले. अधिवेशनाच्या पहिल्या अडीच दिवसांत गदारोळामुळे कोणतेच कामकाज होऊ शकले नाही. मात्र, त्यानंतर कामकाजाला गती आली असे सांगून ते पुढे म्हणाले की, सुरुवातीला १९ तास १२ मिनिटांचा वेळ गदारोळामुळे वाया गेला. मात्र, त्यानंतरच्या दिवसात निर्धारित वेळेपेक्षा २८ तास जास्त कामकाज सदनात चालले. मोटर वाहन सुधारणा विधेयक, नॅशनल मेडिकल कौन्सिल विधेयक ही विधेयके मंजूर करीत असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी परस्पर सहकार्याची भूमिका घेतली. राज्य सरकारांच्या हिताला बाधा येणार नाही, हा दोन्ही बाजूंचा पावित्रा वाखाणण्याजोगा आहे. भविष्यातही राज्यसभेचे असेच चांगल्या पद्धतीने चालेल व लोकहिताचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला.
