‘देशातील सर्वात मोठा सेमीकंडक्टर प्रकल्प ईडी सरकारच्या कृपेने गुजरातला गेला’

0

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉनचा सेमी कंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातने पळवल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

शिंदे सरकारवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कडाडून हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती मंडळांमध्ये गुंग असतानाच 1 लाख 58 हजार कोटींचा देशातील सर्वात मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प तसेच लाखांवर रोजगार देणारा प्रकल्प हातातून गेल्याने सोशल मीडियातही संतापाची लाट उसळली आहे.

माजी गृहराज्य मंत्री आमदार सतेज पाटील यांनी सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला पळवण्यात आल्याने शिंदे सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्विट करून शिंदे सरकावर टिकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप या सरकारने केल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

सतेज पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, धक्कादायक! महाराष्ट्रात होणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीची संयुक्त भागीदारी असलेला 1 लाख 58 हजार कोटींचा देशातील सर्वात मोठा सेमीकंडक्टर उत्पादनाचा प्रकल्प सध्याच्या ईडी सरकारच्या कृपेने गुजरातला नेण्यात आला आहे.

वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारी असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण होता. हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये करण्याबाबत जवळपास निश्चित झाले असताना आणि याबाबत सर्व स्तरावर चर्चा झाली असताना अचानक हा प्रकल्प गुजरातला जाणे अत्यंत धक्कादायक आहे. भविष्याच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी असून महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप या सरकारने आज केले आहे.

वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातने पळवल्याने आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तब्बल 1 लाख 58 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखभर नोकऱ्या उपलब्ध होऊ शकणारा सेमिकंडक्टर्सचा हा प्रकल्प अखेरच्या क्षणी गुजरातमध्ये गेला आहे.

काल आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला, तर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याच सरकारमध्ये मंत्री असलेल्या महाविकास आघाडीवर खापर फोडले. या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारनं प्रयत्न केले होते, असा दावा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 14/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here