चार-चार वेळा मुख्यमंत्री होऊनही प्रकल्प आणले नाहीत, ते आज टीका करतायत; नारायण राणेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

0

मुंबई : शरद पवार हे महान नेते आहेत, चार-चार वेळा मुख्यमंत्री होऊनही त्यांना प्रकल्प आणता आला नाही, तेच आज टीका करत आहेत असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

आता टीका करण्यापेक्षा विधायक कामांसाठी सहकार्य करावं असाही टोला त्यांनी लगावला. फॉक्सकॉन वेदांता वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, हे सगळे महान नेते आहेत, चार चार वेळा मुख्यमंत्री झालेली आहेत, अनुभवी आहेत. ते जे प्रकल्प आणू शकले नाहीत त्यांच्या अपयशाबद्दल न बोलता आज टीका करत आहेत. आता टीका करण्यापेक्षा विधायक कामासाठी सहकार्य करावे एवढेच तुमच्या मार्फत मला त्यांना सांगायचे आहे.

उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पवाल्यांना छळलं
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना कारणीभूत ठरवले. ते म्हणाले की, ज्यांनी हा प्रकल्प घालवला तेच आज टीका करत आहेत. निदान जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. काय काय मागणी केली त्या प्रकल्पवाल्यांकडे. त्यांना छळले गेले आणि म्हणून ते महाराष्ट्रात आले नाहीत. याला कारण उद्धव ठाकरे आहेत.

पर्यटन ट्रेन सुरू व्हावी यासाठी प्रयत्नशील
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, सध्या जी चर्चा सुरू आहे त्या प्रकल्पासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांसोबत भेटलो नाही. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे देवगड-मालवण-वेंगुर्ला अशी एक पर्यटन ट्रेन सुरू व्हावी, त्याचा प्रायमरी प्रस्ताव हा कोकण रेल्वेने बनवला आहे. त्याला लागणारे पैसे राज्य सरकारने द्यावेतअसा प्रस्ताव मी तुमच्याकडे घेऊन येत आहे, हे सांगायला मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. या पलीकडे माझा कोणताही विषय नव्हता.

शरद पवारांची राज्य सरकावर टीका
फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणं हे दुर्दैवी आहे, यावर त्यापेक्षा आणखी मोठा प्रकल्प आणण्याचं आमिष म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखं आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली. यावर आता चर्चा करण्यात काही अर्थ नसल्याचं सांगत पंतप्रधानांनी असा मोठा प्रकल्प दिला तर त्याचं स्वागतच आहे असंही ते म्हणाले. फॉक्सकॉन वादावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 16/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here