संजय राऊतांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल, सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी

0

मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) संजय राऊत यांच्याविरोधात प्रकरणातील पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे.

या पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचा केवळ सहभाग नसून त्यांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी पडद्याआड राहून काम केल्याचे पुरावे सापडल्याचं ईडीनं या आरोपपत्रात नमूद केलेलं आहे. याशिवाय संजय राऊतांच्या जामीनाला विरोध करत ईडीनं स्पष्ट केलंय की, राऊत हे एक राजकिय व्यक्तिमत्व असल्यानं बाहेर येताच ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, त्यामुळे तापस महत्त्वाच्या टप्यावर असताना त्यांना जामीन देणं योग्य ठरणार नाही.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरानं ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. राऊत यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवर न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली असता सोमवारी संजय राऊतांची पुढची रिमांड आणि जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांच्यावरील कारवाई द्वेषातून किंवा राजकीय सूडबुद्धीनं झालेली नसल्याचं स्पष्ट करत राऊतांचा दावा ईडीनं नाकारला आहे. संजय राऊतांनी आपल्या विश्वासू प्रवीण राऊतसह याप्रकरणी मुख्य भूमिका बजावताना पडद्याआडून काम केलेलं आहे. या प्रकरणी तपास अजून सुरू असून राऊत हे राजकारणातील अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे ते जामिनावर सुटल्यास पुराव्यांशी छेडछाड करू शकतात आणि अशा प्रकरणात साक्षीदारांना धमकावल्याची अनेक उदाहरणं आहेत, असा दावा करत ईडीनं संजय राऊतांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला आहे.

संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातील 1 कोटी 8 लाखाचा व्यवहारदेखील संशयास्पद असल्याचे ईडीने कोर्टाला सांगितले. अशाच प्रकारे अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार ईडीला सापडले आहेत. या संशयास्पद व्यवहाराचा तपास ईडीला करायचे असल्याचे ईडीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. संजय राऊत हे प्रभावशाली राजकीय व्यक्तीमत्व असल्याने तपासात आणि साक्षीदारांवर ते प्रभाव टाकू शकतात असे ईडीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. या प्रकरणी एका महिला साक्षीदाराला त्यांनी धमकी दिली असल्याची बाब ईडीने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत राऊत यांना जामीन नाकारण्यात यावा अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 17/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here