व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर

0

रत्नागिरी : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी परीक्षेतील गुणवत्तेवर आधारित राबवली जाते. मात्र, यावर्षी सलग तिसर्‍या वर्षी सीईटीचे निकाल लांबवल्याने प्रवेश प्रक्रिया खोळंबली आहे. नुकताच याचा निकाल जाहीर झाला असला तरी सप्टेंबर मध्यावर आला तरी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही.

बारावी बोर्ड परीक्षेचा जूनमध्ये निकाल लागूनही या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे अद्याप बंदच आहेत. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही यामुळे लांबणीवर पडले आहे. बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय शाखा, अर्किटेक्चर, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषीसह अनेक व्यवसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबवण्यात येते. दोन वर्षे कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. परंतु, सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा ऑफलाईन पध्दतीने ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये घेण्यात आल्या. त्यामुळे निकालही उशिरा लागले. या विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष डिसेंबर अखेरीस सुरू झाले.

मात्र, यावर्षी कोरोना निर्बंध उठले आहेत. विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षण ऑफलाईन सुरळीत सुरू झाल्याने बोर्ड परीक्षा व निकालही वेळेत लागले. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नीट, नाटा, जेईई मेन्स, सीईटी, एमएचटी सीईटी आदी परिक्षांचे नियोजनही लवकरच करण्यात आले होते. मात्र, सीईटी सेलच्या अनागोंदी कारभारामुळे वारंवार परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. अखेर जुलै, ऑगस्टमध्ये सर्व परीक्षा पार पडल्या. मात्र, निकाल लांबवल्याने प्रवेश प्रक्रियांना आता विलंब होणार आहे.
प्रवेश परीक्षेच्या निकालामुळे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया खोळंबल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे अद्याप बंदच आहेत. त्यांचे नवीन शैक्षणिक वर्षही लांबणीवर पडले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 19/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here